LIVE UPDATES

श्रीवर्धनमध्ये फुलला भक्तीचा मळा

भरडखोल ते पंढरपूर पायी वारी विठूनामाच्या गजरात रवाना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 13:37 PM
views 108  views

श्रीवर्धन : आषाढी एकादशीचे वेध लागताच संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल' या जयघोषाने अवघ्या महाराष्ट्राचे रस्ते दुमदुमून गेले आहेत. याच भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला. श्रीवर्धनमधील भरडखोल येथून कोळी समाज बांधव आणि विठ्ठलभक्तांची भव्य पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मुसळधार पावसाची परवा न करता विठूरायाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. 

"टाळ-मृदुंगाचा गजर... 'राम कृष्ण हरी'चा चाललेला अखंड नामजप आणि विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झालेला वारकरी संप्रदाय... हे दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरडखोल ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली आहे. आज सकाळी ठीक ९ वाजता भरडखोल गावातील सर्व कोळी बांधव आणि आजूबाजूच्या गावातील भाविक एकत्र आले आणि या सोहळ्याचा प्रारंभ झाला."

या पायी दिंडीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ ज्येष्ठ वारकरीच नव्हे, तर महिला आणि बालगोपाळांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि हातात टाळ घेतलेली लहान मुले एका रांगेत नाचत-गाजत विठ्ठल भक्तीमध्ये मुग्ध होऊन पंढरीच्या दिशेने निघाली आहेत."

"या वारीचे मुख्य प्रेरणास्थान आणि भरडखोल गावचे वारकरी संप्रदायाचे वैभव, रायगड भूषण पुरस्कृत स.भ.प. श्री. रामचंद्र आण्णा वाघे हे स्वतः या वारीत उपस्थित आहेत. तर वारीला निरोप देण्यासाठी आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती श्री. सचिनभाई कीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. मंदारजी भाई तोडणकर, बोर्ली पंचतनचे युवा कार्यकर्ते सुजितजी पाटील आणि माजी सरपंच दिनेशजी चोगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या."