राजवाड्यात २५ नोव्हेंबरला 'गंधर्वगान' संगीत मैफिलीच आयोजन...!

Edited by: विनायक गावस
Published on: November 17, 2023 19:04 PM
views 41  views

सावंतवाडी : पं.कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं.मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी असून आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांच्या 'गंधर्वगान' या संगीत मैफिलच आयोजन सावंतवाडी राजवाडा येथे शनिवार २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आल आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने नाम. दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही शास्त्रीय संगीत मैफिल आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर,आबा केसरकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.

राजन पोकळे म्हणाले, कित्येक वर्ष सिंधुदुर्गवासी ज्या मैफिलीची आतुरतेने वाट पहात आहेत त्या पं. मुकुल शिवपुत्र यांच्या शास्त्रीय संगीत मैफिली संदर्भात आयोजन करण्यात आले आहे. पं. कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं. मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी विराजमान आहेत. मुलांनी आयुष्यात आपल्या एक पाऊल पुढे असावं असं प्रत्येक आई वडीलांना वाटतं. त्याबाबतीत कुमारजी भाग्यवान आहे. कुमारजींनी अभिजात संगीत ज्या उंचीवर नेऊन ठेवलं तिथून मुकुलजींचं शिक्षण सुरू झालं. त्यामुळे पु. लं. च्या आणि वसंतराव देशपांडेंच्या शब्दांत सांगायचं तर मुकुल नेहमीच कुमारच्या खांद्यावर बसून गातो. गाण्यात कुमारजींच्या कितीतरी पुढे असलेले मुकुलजी हे शास्त्रशुद्ध गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी संगीतात केलेले प्रयोग संगीतक्षेत्रात शिरसावंद्य मानले जातात.

पंडितजी संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि संत साहित्याचे जाणकार आहेत. संस्कृत मध्ये काव्यरचना करणारे पंडितजी हे भारतात सध्या एकमेव आहेत. श्रुतिशास्त्राचा सखोल अभ्यास हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्रय, ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीन मातब्बर घराण्यांची गायकी ज्यांच्या कंठात माता सरस्वतीच्या रूमाने वसली आहे असे पंडितजी साक्षात गंधर्व म्हणूनच ओळखले जातात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीता बरोबरच त्यांनी कर्नाटक संगीताचे शिक्षण पं. एम. डी. रमनाथन यांच्याकडून मद्रास येथे कलाक्षेत्रात राहून घेतले आहे. पं. के. जी. गिन्डे यांच्याकडून त्यांनी धृपद धमारचे शिक्षण घेतले. तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रा. वसंत बापट यांच्याकडून ते संस्कृत शिकले.

भुतीशास्त्रकार आचार्य पं. बाळकृष्ण गंगाधरपंत आचरेकर यांच्याकडून त्यांनी श्रुतीशारखाचे रीतसर शिक्षण घेतले आहे बावीस श्रुतींच्या संवादिनीवर त्यांचं संशोधन सुरू आहे. 'सुसंवादीनी' हा त्यांचा जीवाभावाचा प्रकल्प आहे.  पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम आवर्जून ग्रामीण भागात आयोजित करण्याची इच्छा पंडितजींनी व्यक्त केली आणि आम्ही सुंदरनगरीत एक मैफिल व्हावी यासाठी पंडितजींकडे विनंती केली. पंडितजींनी तत्काळ होकार देऊन कोकणाविषयी असलेली आपुलकी आणि सावंतवाडीशी असलेलं नातं अधोरेखित केलं. पंडितजी आणि अभिजात रागदारी संगीत दोन्हीविषयी आस्था असल्याने आम्ही यावर्षी हा गंधर्वगान योग जुळवून आणला आहे. त्रिपुरारी पौणिमेपूर्वीचा शनिवार म्हणजेच २५ नोव्हेंबर ही तारीख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मैफिलीसाठी निश्चित केली आहे. विशेष मैफिल कोकणातील एक निसर्गरम्य शहर सावंतवाडी म्हणजेच सुंदरनगरीत आयोजित करण्यामागे संगीत रसिकांना श्रवणीय आणि प्रेक्षणीय अशी दुहेरी मेजवानी देण्याचा हेतू आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसारासाठी आणि संवर्धनासाठी पं. मुकुल शिवपुत्र जे प्रयत्न करीत आहेत त्यात आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. पं. मकुल शिवपुत्र अभिजात संगीत अकादमी' आणि पं. कुमार गंधर्व गुरुकुलमच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा हीच त्या मागची भावना आहे‌. अशा सुरेल सोहळ्यात आपला सहभाग आनंददायी असेल,  सर्व संगीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजन पोकळे यांनी केले आहे.