
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील गावडेवाडी येथील भंगारच्या मोठ्या गोडावूनला गुरुवारी आज पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत गोडावूनसकट सुमारे ४ लाख रुपयांच्या आसपास मोठे नुकसान झाले. हे गोडावून शहरापासून काहीसे दूर असल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. नगरपंचायतच्या अग्निशमन बंबने आगीवर नियंत्रण आणले. मात्र पाऊस नसल्याने ही आग आज संपूर्ण दुपारपर्यंत धुमसत होती. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाजारपेठेलगत असलेल्या सिंधुदुर्ग बँक जवळील गावडेवाडी या ठिकाणी पश्चिम बंगाल येथील गयापाल कश्यप याचे पुठ्ठे व प्लास्टिक, बाटल्या, रद्दी पेपर वस्तूंचे मोठे गोडावून आहे. गयापाल कश्यप हा दोडामार्ग परिसरात पुठ्ठा, पुठ्ठेवाला म्हणून प्रसिद्ध आहे. कित्तेक वर्षे तो दोडामार्ग तालुक्यात आपला व्यवसाय करत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच दुकानातील पुठ्ठे रद्दी तो गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याने आपल्या गोडाऊन मध्ये पूर्ण पुठ्ठे भरून एक लोड तयार केला होता. मात्र त्याच्या गोडावूनला आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत १८ हजार रुपयाचा वजन काटा, ७० हजार रुपये किंमतीची पुठ्ठे प्रेस मशीन, तसेच रद्दी, पुट्ठे अन्य साहित्य आगिच्या भक्षस्थानी मिळाले. यामध्ये त्याचे एकूण ४ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या गोडावून मध्येच रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा मोठा साठा देखील होता. तो सुदैवाने वाचला.
या आगीची माहिती लगतच्या रहिवाशांनी पोलिसांना कळविली. ही बातमी नगरसेवक संतोष नानचे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन बंब तात्काळ बोलविण्यात आला. त्यानंतर पोलीस तसेच दोडामार्ग नगरपंचायतचा अग्नीशमन बंब त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.
वैयक्तिक भांडणातून आग लावली : गयापाळल कश्यप
दरम्यान काल बुधवारी आपला कर्नाटक येथील एका साथीदाराबरोबर भांडण झाले होते. त्या रागातून त्याने माझ्या गोडाऊनला आग लावली असावी अस गोडाऊन मालक गयापाल कश्यप याने सांगितले. मी त्याला आता विचारणा करणार आहे. पोलिसात तक्रार देणार असल्याचे त्याने बोलताना सांगितले.