बाजारपेठ कट्टा येथील सभागृह ग्रामस्थांसाठी खुले करण्यासाठी उपोषण

Edited by:
Published on: January 22, 2025 18:11 PM
views 118  views

सिंधुदुर्ग :  बाजारपेठ कट्टा येथे खासदार निधीमधून बांधण्यात आलेले बहुउ‌द्देशिय सभागृह ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे या मागणीसाठी उपोषण छेडण्यात येणार आहे. 24 जानेवारीपासून अॅड. गीता काळे व आनंद रावले ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. 

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रात कट्टा बाजारपेठ येथे 'केंद्र पुरस्कृत खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०१८-१९' खासदार  नारायण राणे, राज्यसभा सदस्य यांचे निधीमधून बहुउद्देशिय सभागृह बांधण्यात आलेले आहे. ते सभागृह खासगी व्यावसायिकास भाडयाने दिल्याबाबतची तक्रार अॅड. गीता काळे व अन्य ग्रामस्थांनी दिनांक २१ मार्च  २०२४ ला  गटविकास अधिकारी पंचायत समिती मालवण यांच्याकडे केली होती. त्यावेळी  गटविकास अधिकारी यांनी केलेल्या पाहणीमध्ये हे सभागृह भाडयाने देण्याच्या अभिलेखामध्ये गंभीर अनियमितता आढळून आलेली असून त्याबाबत संबंधित तत्कालिन सरपंच, विद्यमान सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई प्रस्तावित केलेबाबत अर्जदार यांना गटविकास अधिकारी कार्यालयाकडून कळविणेत आलेले आहे. या कारवाईसही पंचायत समिती स्तरावर विलंब होत आहे. त्याचा पाठपुरावा अर्जदार करतच आहेत. परंतु दरम्यानच्या काळात गावासाठी बांधण्यात आलेले बहुउद्देशिय सभागृह ग्रामस्थांसाठी खुले करण्यात यावे यासाठी अर्जदार अॅड. गीता काळे, आनंद रावले व अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय, मागील वर्षभरात झालेल्या ग्रामसभा, पंचायत समिती कार्यालय येथे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. २६ सप्टेंबर २०२४ ला तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्येही टोकन नं. ३३ अन्वये अर्जदार यांनी त्याबाबत अर्ज दिला आहे. परंतु आमच्या अर्ज-विनंत्यांची कोणतीही दखल प्रशासनाने आजवर घेतलेली नाही असे अर्जदार ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यामुळे हे बहुउद्देशिय सभागृह खासगी व्यावसायिकास भाडयाने न देता सदर सभागृहाच्या प्रस्तावामध्ये नमूद केल्याप्रमाणे गावातील २५१० ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे या मागणीसाठी अॅड. गीता काळे व  आनंद रावले दिनांक २४ /जानेवारीपासून ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यालयासमोर उपोषणास बसत आहेत.

 नारायण राणे आज लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचे सुपुत्र विधानसभेमध्ये आमदार, मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री पद भूषवित आहेत. तरीही खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीमधून बांधण्यात आलेल्या सभागृहावर त्यांच्या नावाचा साधा बोर्ड नसणे, हे सभागृह ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे या मागणीसाठी आम्हां सामान्य ग्रामस्थांना उपोषणास बसावे लागणे ही घटना दुर्दैवी आहे अशी खंत अर्जदार अॅड. गीता काळे यांनी व्यक्त केली आहे.