वासुदेव कलाकारांना मारहाण प्रकरणाला वेगळे वळण..?

Edited by: भरत केसरकर
Published on: September 30, 2023 16:17 PM
views 1288  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिंगुळी येथे वासुदेव कलाकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. वासुदेव कलाकारांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये संबंधित पाचही वासुदेव कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व वासुदेव राहणार बारामती पुणे येथील असून कलम 420 आणि महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 कलम 3 नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. यानंतर हे दोन दिवस पोलीस कस्टडी मध्ये होते.

त्यानंतर वासुदेव कलाकार मारहाण प्रकरणी पोलिसांनी तो व्हिडिओ बघून स्वतःहून मारहाण करणाऱ्या सात ग्रामस्थांवर कायदा हातात घेतल्या प्रकरणी कलम 143,147,149,323,504,506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यानंतर कुडाळ मधील सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. व या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कारण हे वासुदेव होते हे प्रत्यक्षात वासुदेव नसून भुरटे भामटे व फसवे असल्याचा आरोप केला आहे. कारण या वासुदेवांकडून पिंगुळी परीसरातील महीलांची फसवणूक केल्याच समोर आलं आहे. या महीलांना भिती दाखवून गंडे, दोरे देऊन त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप येथील स्थानिक महीला व ग्रामस्थांनी केला आहे.