सावंतवाडीतील सार्वजनिक नवदुर्गांना भक्तिभावाने निरोप

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2024 11:20 AM
views 335  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील सार्वजनिक नवदुर्गांना शनिवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरासह निघालेल्या भव्य विसर्जन मिरवणूका खास आकर्षण ठरल्या. हा सोहळा अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक सावंतवाडीनगरीत दाखल झाले होते. 

नऊ दिवसांच्या उत्सवानंतर शनिवारी विजयादशमीला नवदुर्गांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ, माठेवाडा मित्रमंडळ, ओंकार नवरात्रोत्सव मंडळ भटवाडी व रासाई मंडळाच्या नवदुर्गांच्या विसर्जन मिरवणूका लक्षवेधी ठरल्या. भव्यदिव्य देखावे मंडळाकडून साकारण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक सावंतवाडीत उपस्थित होते. रात्री उशिरा मोती तलाव येथे नवदुर्गांचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील माजगाव, बांदा, इन्सुली, कोलगाव, माडखोल, तळवडे आदी भागात देखील नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील नवदुर्गांच शनिवारी रात्री मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले.