आंबोलीत 150 फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Edited by: विनायक गावस
Published on: June 20, 2023 19:51 PM
views 417  views

सावंतवाडी : आंबोली घाटामध्ये दरड पडलेल्या ठिकाणापासून 200 मीटर अंतरावर सावंतवाडीच्या दिशेने जवळपास दीडशे फूट खोल दरीमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह त्या ठिकाणी काही कारणास्तव थांबलेल्या ग्रामस्थांना दिसून आला. त्यांनी याबाबत आंबोली पोलीस स्थानकामध्ये खबर दिल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस दत्तात्रय देसाई दीपक शिंदे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

अंधार होत असल्याने मृतदेह काढण्याची मोहीम दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी करण्याचे ठरले. हा मृतदेह अंदाजे 35 ते 40 वयाच्या पुरुषाचा असावा असा अंदाज व्यक्त होत असून यामध्ये घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. वर्षा पर्यटनाच्या तोंडावर पुन्हा एकदा अशा प्रकारे आंबोली घाटामध्ये मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार घडल्याने येथील पर्यटनाला आणि आंबोलीच्या नावाला पुन्हा एकदा गालबोट लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

आंबोली येथील पर्यटन व्यवसायिकांनी याबाबत पर्यटकांना कोणतेही भीती बाळगण्याची गरज नसून आंबोली पोलीस तसेच स्थानिक नागरिक पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सक्षम असल्याचे सांगितले आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी आंबोली पोलिसांनी सजक राहण्याची गरज असल्याचे मत आंबोलीतील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्याने आंबोली येथील रेस्क्यू टीमने पाहणी केली असता त्यांना भौगोलिक वातावरण आणि अंधारामुळे ही मोहीम बुधवारी करण्याचे निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे बुधवारी ही मोहीम सावंतवाडी पोलीस निरीक्षक तसेच आंबोली पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली रेस्क्यू टीम मार्फत उद्या राबवली जाणार आहे.