
दोडामार्ग : झोळंबे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फुगडी स्पर्धेत श्री देव रवळनाथ कला आणि सांस्कृतिक ग्रुप हरमल, पेडणे गोवा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर सातेरी युवा फुगडी मंडळ इब्रामपूर गोवा यांनी द्वितीय व श्री सातेरी महिला फुगडी ग्रुप मणेरी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
झोळंबे येथील भजनी प्रेमी महिला व ग्रामस्थ यांनी फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच उद्घाटन युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्या हस्ते झाले. त्यानी अशा स्पर्धा आयोजना बाबत आयोजकांचे अभिनंदन केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात आला. नवदुर्गा महिला कला संघ कासारवर्णे गोवा व विघ्नहर्ता फुगडी ग्रुप साळ पुनर्वसन गोवा यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. उत्कृष्ट गायक म्हणून रश्मी नाईक, उत्कृष्ट वादक म्हणून श्री सातेरी महिला फुगडी ग्रुप मणेरी, उत्कृष्ट नृत्य जोडी म्हणून नवदुर्गा महिला कासारवर्णे, उत्कृष्ट कोरस म्हणून राष्ट्रोळी महिला फुगडी उगवे व उत्कृष्ट निवेदक म्हणून शामल भुजबळ यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उद्योजक बाबा टोपले, माजी सरपंच राजेश गवस, माजी उपसरपंच पांडुरंग गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाती गवस, उपसरपंच विनायक गाडगीळ, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकर गवस, संदीप गवस व परीक्षक प्रकाश तेंडोलकर उपस्थित होते. सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजच्या प्राध्यापिका हर्षदा परब यांनी फुगडी संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली गवस व आभार तृप्ती गवस यांनी मानले.