
सावंतवाडी : नेमळे येथून सावंतवाडी शहराच्या दिशेने रस्त्याला माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधीस्थळालगत अचानकपणे रस्त्यावर आलेल्या रानगव्याची धडक बसल्याने दुचाकीस्वार प्रथमेश प्रभाकर कोरगावकर (२८) या युवकासह दुचाकीवरील पूर्वा नामदेव राऊळ (१४, दोघेही रा. नेमळे एरंडवाकवाडी ) हे जखमी झाले. अपघातानंतर पूर्वा हिला उपचारार्थ त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.
प्रथमेश हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी नेमळे येथून सावंतवाडी येथे येत होता. सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील माजगाव पंचम नगर येथे आला असताना जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या रानगव्याची जोरदार धडक त्याच्या दुचाकी ला बसली. या अपघातात दुचाकी वरून रस्त्यावर पडल्याने प्रथमेश व त्याच्या दुचाकीवरील पूर्वा राऊळ ही दोघेही जखमी झाली. तर या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
माजगाव येथील या ठिकाणी रानगव्यांचा नेहमीच वावर असतो. गावातून जंगलाच्या दिशेने जाण्याचा हा नेहमीचा मार्ग असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. तसेच अनेक वेळा दुचाकी स्वरांचा या ठिकाणी अपघात झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
त्यामुळे वनविभागाने याबाबत त्वरित सुरक्षिततेची उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.