
सावंतवाडी : कराड येथे सुशांत आप्पासो खिल्लारे (२६, रा. पंढरपूर) याचा खून केल्याप्रकरणी ताब्यात असलेला तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर येथील सावंतवाडी पोलीस ठाण्यात खुनासह, अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे, तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभाय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरीकडे घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी आंबोली येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तर शवविच्छेदन अहवालानंतर खिल्लारे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
यातील आर्थिक व्यवहारातून खून करण्यात आलेल्या खिल्लारे याचे नातेवाईक गुरुवारी दोन दिवसांनी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात सकाळी सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अपहरण करणे, डांबून ठेवणे, पुरावा नष्ट करणे यासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत श्री. मेंगडे म्हणाले की, या प्रकरणात संबंधित खिल्लारे याचे नातेवाईक आले. परंतु त्यांनी आपला आणखी कोणावर संशय नाही, तसेच अन्य कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार आता पुढील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.