नगरसेविका प्रणाली माने, मिलींद माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 14, 2023 15:59 PM
views 1474  views

देवगड : देवगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलाला रस्त्यामध्ये अडवून मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मिलिंद माने व पत्नी नगरसेविका प्रणाली माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वा. सुमारास तुळशीनगर येथील वेदांत बीअर शॉपीजवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड कनिष्ठ महाविद्यालयात सायन्स शाखेत शिकत असलेला एका अल्पवयीन मुलाला 11 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर तुळशीनगर येथील परशुराम अपार्टमेंट जवळ असलेल्या वेदांत बिअर शॉपी नजीक मित्रांसमवेत गप्पा मारत उभा असताना मिलिंद माने यांनी फोनवर शिवीगाळ करून तू कुठे आहेस ते सांग असे बोलून अचानक गाडी क्रमांक एम एच 07 1212 ही हुंडाई आय 10 गाडी घेऊन येऊन त्या अल्पवयीन मुलाला गप्पा मारत त्याला आडव्या होऊन त्याच्या कानशिलात मारले व गडग्यावर आपटले. यावेळी त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांना देखील मिलिंद माने यांनी दम दिला व मिलिंद माने यांनी बेसबॉल बॅट चा वापर करून त्या अल्पवयीन मुलाच्या खांद्यावर मारली. त्यावेळी सोबत असलेली मिलिंद माने यांची पत्नी नगरसेविका प्रणाली माने यांनी या महाराणीचे व्हिडिओ शूटिंग करत याला चांगला चोप द्या असे सांगून दोघांनी त्याला मारून टाकू अशी धमकी दिली व गाडी घेऊन पळून गेले.

हा प्रकार त्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले व देवगड़ पोलीस ठाण्यात मुलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली. या तक्रारी पोलिसांनी नगरसेविका प्रणाली माने व मिलिंद माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.