
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील कर्ली नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून तिचा साठा केल्याप्रकरणी एका आरोपीवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत दत्तात्रय मसुरकर, मंडळ अधिकारी, कुडाळ यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबाजी सखाराम मांजरेकर, वय ३५ वर्षे, रा. सोनवडे तर्फ हवेली, याने २५/०८/२०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय कर्ली नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करून ती चोरली आणि तिचा अवैध साठा केला.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादींचे भरारी पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या बेकायदेशीर कृत्याबद्दल कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९०/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम ३०३(२), खाण आणि खनिज अधिनियम २१, पर्यावरण अधिनियम १५, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळसेकर करत आहेत.