
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीत उद्योग आणण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत रोजगाराच्या मुद्यावरून प्रचारात उतरणार असून प्रसंगी स्वतंत्रपणे उमेदवार दिला जाईल अशी भूमिका आडाळी औद्योगिक क्षेत्र कृती विकास समितीचे अध्यक्ष पराग गांवकर व सचिव प्रवीण गांवकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले गेल्या वर्षी रखडलेल्या आडाळी एमआयडीसीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आडाळी ते बांदा असा लॉंग मार्च काढण्यात आला होता. या ऐतिहासिक आंदोलनाला उद्या एक वर्ष पुर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करण्यात आली. यावेळी सुनील गांवकर उपस्थित होते.
गांवकर म्हणाले, 2014 साली आडाळी एमआयडीसी मंजूर झाली. मात्र, दहा वर्षे झाली तरी येथे एकही उद्योग सुरु झाला नाही. स्थानिकांनी केलेले सहकार्य आणि पाठपुरावा पाहता आज मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय अनास्था असल्याने एकही उद्योग आडाळीत अद्याप आला नाहीं. समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षात आंदोलन झाली. लॉंग मार्च आंदोलनानंतर सत्ताधाऱ्यांकडून उद्योग आणण्यासाठी हालचाली होतील अशी अपेक्षा होती, मात्र गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचं दिसत नाहीं. गेल्या दोन वर्षांपासून जे उद्योजक महामंडळकडे प्लॉट्सची मागणी करत आहेत, त्यांना प्लॉट्स देण्याबाबत देखील दिरंगाई केली जात आहें. शिवाय येथे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत नाहीं, यां उलट फसवी आश्वासन देऊन जनतेच्या भावनांची चेष्टा केली जात आहें.
त्यामुळे आगामी काळात रोजगाराचा मुद्दा जनतेपर्यंत नेऊन जनभावना संघटित केली जाईल. आगामी निवडणुकीच्या आधीपर्यत गावावर संपर्क अभियान राबविण्यात येईल. जनमताचा कानोसा घेऊन आगामी निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे यावेळी पराग गावकर म्हणाले.
फोटो
पत्रकार परिषदेत बोलताना कृती समितीचे अध्यक्ष पराग गावकर बाजूला प्रवीण गावकर