कुडाळातील व्यावसायिकाला मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली मारहाण

पोलिसांवर चप्पल मारण्यापर्यंत महिलांची मजल
Edited by:
Published on: January 01, 2025 11:20 AM
views 1737  views

कुडाळ : इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून झालेल्या वादावादी मध्ये कुडाळ कविलकाटे येथील व्यावसायिक आप्पा गडेकर याला इनोवा कारमधील मुंबई भाजपचे युवा मोर्चा अध्यक्षासह त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी बेदम मारहाण केली. या भाजपच्या पदाधिकारी व महिलांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले या ठिकाणी युवा मोर्चा अध्यक्ष अमित शेलार यांनी दबाव आणण्यासाठी आपल्या राजकीय पदाचा वापर केला. मात्र कुडाळ येथील नागरिकांनी पोलीस ठाणे येथे गर्दी केली होती.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले भाजपचे मुंबई युवा मोर्चाचे पदाधिकारी, कुर्ला येथील नगरसेविका यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची इनोवा कार मंगळवारी दुपारी कुडाळ गांधी चौक येथे आल्यावर ती रेल्वे स्थानक रस्त्याच्या दिशेने जात असताना आळवे फरसाण मार्टच्या समोर असलेल्या कविलकाटे येथील आप्पा गडेकर यांच्या दुकानासमोर असलेल्या तीन मोटरसायकलला धडक दिली. आणि याबाबत आप्पा गडेकर हे विचारायला गेल्यावर त्यांना या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली पाऊण तास या महिला शिव्यांची लाखोली वाहत होत्या तसेच आप्पा गडेकर व सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर चप्पल मारण्यापर्यंत या महिलांनी मजल मारली. राजकीय दबाव आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान हे प्रकरण कुडाळ पोलीस ठाण्यात आले यामध्ये युवा मोर्चा अध्यक्ष यांनी मुंबई येथील पोलीस अधिकाऱ्यांसह इतर राजकीय पुढार्‍यांना फोना फोनी केली. दरम्यान ही घटना समजतात कुडाळ शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. किरकोळ वादावरून भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शहरात धिंगाणा घातला उशिरापर्यंत कुडाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी देण्याचे काम सुरू होते.