ओवळीये मध्ये भाजपला धक्का

Edited by:
Published on: November 11, 2024 18:15 PM
views 314  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील ओवळीये-बौद्धवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.ओवळीये गावचा विकास हा आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते ओवळीये गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले निलेश राणे यांच्या पडत्या काळात त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी साथ दिली मात्र विधानसभा निवडणूकीत कुडाळ-मालवण मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विचार न करता शिंदे गटात उडी मारली आहे तसेच  राणे कुटुंब हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष,भाजप आणि आता निलेश राणे हे शिंदे गटात गेले आहेत,त्यांच्या या सततच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची फरपट होत आहे.त्यांच्या या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून व निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणाऱ्या निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत ओवळीये गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही,असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभा गावशाखा अध्यक्ष पायल जंगम,उपाध्यक्ष धर्मेंद्र जंगम,बाबा आंगणे,विभागप्रमुख बंड्या चव्हाण,प्रदीप परब,संजय पडवळ, अंबाजी सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.