चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय !

बांधकाम साईटवरील परप्रांतीय कामगारांची नोंदणी बंधनकारक
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 06, 2024 11:15 AM
views 666  views

कणकवली : कणकवली शहरात कायदाने सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने रात्री ११ वाजल्यानंतर अनावश्यक रात्री अपरात्री फिरणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.कणकवली तालुक्यात घरफोड्या,चोरी,अपहरण गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत. बांधकाम इमारती व अन्य साईटवर परप्रांतीय कामगार आलेले आहेत. त्या कामगारांची नोंदणी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी व त्यांच्या मालकांनी कणकवली पोलीस ठाण्यात करावी, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिला आहे.


कणकवली तालुका आणि शहरात होणाऱ्या घरफोड्या,अपहरण प्रकार  व अन्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे.शहरात रात्री काही स्टॉल व टपऱ्या उशिरापर्यंत चालू असतात.त्या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण व परप्रांतीय कामगार फिरत असल्याचे आढळून येत आहेत.आतापर्यंत त्यांना समज देवून सोडण्यात येत आहे.तसेच कणकवली शहरात बुलेट व अन्य दुचाकीस्वार मोठमोठे आवाजाने रात्री अपरात्री वाहने फिरवून शांतता भंग करीत नागरिकांना त्रास दिला जात आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे युवक रात्री अपरात्री  शहरातील कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रात्री ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिले आहे.