
सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे रुग्णसेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येत आहेत. 86 नवीन इंटर्न डॉक्टर्स रुग्णसेवेमध्ये रुजू झाले असून, रुग्णालयात अनेक नवे विभाग व कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे 86 नवीन इंटर्न डॉक्टर्स रुग्णसेवेमध्ये रुजू झाले. नव्याने सुरु करण्यात आलेल्या आय.सी. यु. व विविध कक्षांमध्ये त्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या असून रुग्णसेवेमध्ये प्रभावी बदल करण्यात आला.
डॉ. शिल्पा नारायणकर वैद्यकीय अधीक्षक पदावर रुजू
रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालय नुकतेच सुरु करण्यात आले असून डॉ. शिल्पा नारायणकर, प्राध्यापक, विकृतीशास्त्र यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
रुग्णालयामध्ये नवे विभाग/कक्ष सुरु,
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केलेल्या मार्गदर्शनानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षात रुग्णालयामध्ये नवे विभाग, कक्ष सुरु करण्यात आले. या रुग्णालयामध्ये प्री- ऍनेस्थेशिया चेक-अप ओपीडी, रेबीज प्रतिबंध ओपीडी, सर्जिकल आय. सी. यु., मेडिकल आय. सी. यु. इत्यादी नवीन कक्ष सुरु करण्यात आले. नवीन लघुशस्त्रक्रियागृह कक्षाचे काम प्रगतीपथावर असून लघुशस्रक्रिया गृहामध्ये दररोज सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये बाह्यरुग्ण विभाग येथे जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, कान नाक व घसा शास्त्र, नेत्र चिकित्सा शास्त्र, स्त्रीरोग इत्यादि विभागाशी संबंधित लघु शस्त्रक्रिया विविध विभागाशी संबंधित सर्जन व तज्ज्ञांमार्फत पार पाडल्या जातील. लघु शस्रक्रियांमध्ये शरीरावर असलेल्या विविध गाठी जसे कि चरबीच्या गाठी, घामाच्या ग्रंथीच्या गाठी, सिस्ट तसेच कर्करोगाशी संबंधित बायोप्सी, लिंफ नोड बायोप्सी, अल्सर सर्जरी इत्यादी शस्रक्रिया होणार आहेत.
औषधांकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत 1 कोटी मंजूर
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत औषधांकरिता रुपये 1 कोटी इतक्या निधीला सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता मंजुरी दिली आहे. तसेच सन 2024-25 या वर्षात जिल्हा नियोजन समिती मार्फत प्राप्त निधीमधून रुग्णांकरिता औषधे खरेदी करण्यात आली असून सद्यस्थितीत 3 महिने पुरेल इतका मुबलक औषधीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.
सी- आर्म मशीन व हिस्टोपॅथोलॉजी तपासणी होणार सुरु
ऑर्थोपेडिक विभागाकरिता सी- आर्म मशीन व पॅथॉलॉजी विभागाकरिता हिस्टोपॅथोलॉजी तपासणी मशिन्स घेण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत रुपये 1 कोटी इतक्या निधीला सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता मंजुरी दिली आहे. त्यामुळे या सेवा लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरु होणार लॅप्रोस्कोपी व एन्डोस्कोपी सेंटर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्जरी विभागामध्ये लॅप्रोस्कोपी व एन्डोस्कोपी सेंटर सुरु होणार असून सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेकरिता शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
महाविद्यालयामध्ये डि.एन.बी. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
महाविद्यालयामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये डि.एन.बी. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून जनरल मेडिसिन विषयाकरिता 2, ऍनेस्थेशिया विषयाकरिता 2 व स्रीरोग व प्रसूतीशास्त्र विषयाकरिता 1 असे एकूण 5 पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.
रुग्णालयामध्ये 219 पदे बाह्य श्रोतांमार्फत लवकरच भरण्यात येणार
अधिपरिचारिका, औषधनिर्माता, आहारतज्ञ, इ.सी.जी. तंत्रज्ञ इत्यादी रुग्णसेवेकरीता अत्यंत महत्वाची अशी एकूण 219 पदे लवकरच बाह्य श्रोतांमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानंतर रुग्णालयामध्ये त्वचारोग शास्त्र, मनोविकृती शास्त्र, कान नाक व घास शास्त्र अश्या विविध विभागाकरिता नवीन रुग्ण कक्ष सुरु करण्यात येतील. तसेच श्वसनासंबंधीच्या आजारांकरिता आय. आर.सी.यु. व हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्यात येईल.
नवीन 50 खाटांचे क्रिटिकल केअर रुग्णालय मंजूर
50 खाटांचे क्रिटिकल केअर रुग्णालयाला शासनाकडून परवानगी मिळाली असून जागा निश्चित करण्यात आली आहे. लवकरच त्याचे बांधकाम सुरू होणार आहे.
एम.आर.आय. तपासणी सेवा बाह्यश्रोतांमार्फत उपलब्ध होणार
क्ष-किरण शास्र विभागाकरिता एम.आर.आय. मशीन चा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत एम.आर.आय. तपासणी सेवा बाह्यश्रोतांमार्फत उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.
शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला केंद्र शासनाकडून मान्यता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात बी. एस. सी. नर्सिंग अभ्यासक्रमाकरिता 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
महाविद्यालयाच्या सुरक्षे मध्ये होणार वाढ
महाविद्यालयात सद्यस्थितीत 36 सुरक्षा रक्षक कार्यरत असून 45 नवीन सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याकरिता रत्नागिरी सुरक्षा मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे बंदूकधारी जवान नियुक्त करण्याकरिता लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता 44 आसन क्षमतेची बस मंजूर.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता आवश्यक 44 आसन क्षमतेच्या बसला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून बस शैक्षणिक सेवेमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे.
नवीन मुलांचे वसतिगृह सुरु
ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथील बी.एस.एन.एल. च्या अखत्यारीत असलेली इमारत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आली असून नुकतीच ताब्यात घेण्यात आली. मुलांना लवकरच रूम्स चे वाटप करण्यात येईल. डॉ. रामचंद्र नागरगोजे, वसतिगृह प्रमुख, मुलांचे वसतिगृह.
गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
सतत अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांची अन्य संस्थेमध्ये बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच त्यांचे ठिकाणी कर्तव्यदक्ष व सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याकरीता शासनास विनंती करण्यात आली आहे.