
सिंधुदुर्गनगरी : जिल्हयातील 821 लाडक्या लेकींना लेक लाडकी योजनेअंतर्गंत पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी पाच हजारांचा लाभ या वर्षात देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात दिनांक 01 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनामार्फत लेक लाडकी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गंत एकूण 01 लाख 01 हजार रुपये वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत मुलींच्या खात्यावर जमा केले जातात. जन्मानंतर पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा दिला जातो. मुलगी पहिली इयत्तेत गेल्यावर 06 हजार रुपये, इयत्ता सहावीमध्ये गेल्यावर 07 हजार रुपये, इयत्ता अकरावीत गेल्यावर 08 हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर उर्वरित 75 हजारांचा शेवटचा हप्ता असे एकूण 01 लाख 01 हजार रुपये जमा केले जातात.
सन 2024-2025 या आर्थिक वर्षात जिल्हयातून एकूण 821 पात्र लाभार्थी मुलींना लेक लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात रुपये पाच हजार प्रमाणे एकूण 41,05,000/- इतक्या रकमेचा लाभ जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत अदा करण्यात आलेला आहे.
सदर लेक लाडकी योजना ही राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाहय मुलींचे प्रमाण 0 (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येते. सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
लेक लाडकी योजनेबाबत अधिक माहितीसाठी नागरीकांनी आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेविका व तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.