
मालवण : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मालवणात 1844 मतदारांपैकी 1492 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात शांततेत 80.91 टक्के मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात ही थेट लढत झाली. दोन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज बुधवारी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मालवणात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. तरीही मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले. मालवण तालुक्यात तहसील कार्यालय येथे दोन, आचरा, मसुरे, कट्टा येथे प्रत्येकी एक अशी पाच मतदान केंद्रे होती. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.
तहसील कार्यालयातील केंद्र क्रमांक 110 मधील केंद्रावर 367, केंद्र क्रमांक 110 अ 392, आचरा - 231, मसुरे - 146, कट्टा - 356 असे एकूण 1492 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वच मतदान केंद्राच्या शंभर मिटर बाहेर महायुती आणि महाविकास आघाडीच्या बूथवर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पाऊस असूनही कार्यकर्ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत बूथवर ठाण मांडून होते. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने विजयाचे दावे केले आहेत.