
सिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्वर : सोमवारी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जनता दरबारात विविध विभागांचे मिळून एकूण 82 तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 74 तक्रार अर्जांवर निर्णय घेण्यात आला. दरम्यान या दरबारात कातकरी समाजाच्या सुमारे 70 घरांचा प्रश्न मार्गी लागला असून यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील स्वतःची जागा दिली आहे.
सोमवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार संपन्न झाला. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह अधिकारी, खाते प्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. या जनता दरबारात एकूण 82 अर्ज प्राप्त झाले यापैकी 74 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यामध्ये महसूल विभाग 24 अर्ज प्राप्त 18 अर्ज निकाली काढण्यात आले, तर सहा अर्ज बाकी राहिले आहेत. नगर विकास विभागात संदर्भात सात अर्ज प्राप्त झाले होते हे सातही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. विद्युत विभाग, एसटी विभाग आणि बीएसएनएल विभाग यांचे एकूण आठ अर्ज प्राप्त झाले होते, हे आठही अर्ज निकाली करण्यात आले आहेत तर पीडब्ल्यूडी, पाटबंधारे आणि महामार्ग यांचे मिळून नऊ अर्ज प्राप्त झाले होते हे सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. पोलीस विभागासंधर्भात एकूण दोन अर्ज आले होते हे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले. ग्राम विकास विभागासंदर्भात एकूण 16 अर्ज प्राप्त झाले होते हे 16 ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
कृषी विभाग आणि आरोग्य विभाग यांचे मिळून एकूण पाच अर्ज प्राप्त झाले होते हे पाचही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. मच्छ विभाग, पतन विभाग यांचे तीन अर्ज प्राप्त झाले होते हे तीनही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत, तर समाज कल्याण विभाग नगर रचना आणि खारभूमी यासंदर्भात दोन अर्ज प्राप्त झाले होते हे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ग्रामसडक योजनेअंतर्गत सहा अर्ज प्राप्त होते यापैकी चार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत तर दोन अर्ज बाकी राहिले आहेत.
बाकी राहिलेल्या आठही आर्जांवर कारवाई करून हे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्राप्त एकूण 82 आर्जांपैकी 74 अर्ज या दरबारातच निकाली काढण्यात आले असून, उर्वरित आठ अर्ज लवकरात लवकर निकाली निघतील असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.