इन्सुलीत 71 लाख 58 हजाराची गोवा बनावटीची दारु जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 11, 2023 17:36 PM
views 229  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अवैध दारु वाहतूक व विक्री करणा-यांविरुध्द कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक, संदिप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.

10 ऑक्टोबरला सहा. पोलीस निरीक्षक, महेंद्र घाग यांना विश्वसनिय माहिती मिळाली की, ट्रक क्रमांक KA-22-C-3416 यामध्ये गोवा बनावटीची अवैध दारु भरुन तो ट्रक गोवा येथून मुंबईकडे जाणार आहे. त्यावरुन सहा. पोलीस निरीक्षक  महेंद्र घाग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलदारांना सोबत घेवून सदरचा ट्रक पकडणेसाठी नियोजनबध्द सापळा रचला. दिनांक 11.10.2023 रोजी 00:45 वाजताचे दरम्याने खामदेव नाका, इन्सुली येथे नमूद क्रमांकाचा ट्रक मुंबईच्या दिशेने येत असल्याचे दिसले, त्याला खामदेव नाका, इन्सुली येथे थांबवून त्याचे हौद्यामधील मालाची खात्री केली असता ट्रकाचे हौद्यामध्ये बॉल पुट्टीच्या गोणी पाठीमागे लावून त्यापुढे गोवा बनावटीची दारु भरलेली असल्याचे दिसले. सदरचा ट्रक मोठा असल्यामुळे व हौद्यामध्ये भरलेल्या दारुचे मोजमाप करणेसाठी सदरचा ट्रक बांदा पोलीस ठाणे येथे नेला. सदर ठिकाणी अवैध गोवा बनावटीच्या दारुची खात्री केली असता सदर ट्रकमध्ये एकुण 71.58,000/- रुपये (एकाहात्तर लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीची विविध प्रकारची बिगर परवाना गोवा बनावटीची दारू मिळून आली.

सदरबाबत बिगर परवाना गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असताना मिळून आल्याने जोतीबा परशुराम गावडे, वय 30, रा. घर नं. 1527, शिवाजीनगर, बेळगांव याचे विरुध्द बांदा पोलीस ठाणे गु.र.नं. 111/2023, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65(अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात 15,00,000/- रुपये किंमतीचा ट्रक क्र. KA-22-C-3416 व 71,58,000/- रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा मिळून 86,58,000/- रुपये (शहाऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई  सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदिप भोसले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षकमहेंद्र घाग व पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, किरण देसाई, आशिष जामदार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर व अंगुली मुद्रा विभागाचे अंमलदार संतोष सावंत यांनी केलेली आहे.