भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 19, 2024 14:18 PM
views 98  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता असा होता. या परिषद दोन सत्रात विभागण्यात आली होती. प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी कार्यकारी उपाध्यक्ष गणाधीश कामत उपस्थित होते. त्यांनी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुणवत्ता प्रणालीचा विकास कसा करता येईल व त्यासाठी सिक्स सिग्मा यासारख्या सांख्यिकी प्रक्रियांचा उपयोग कसा करावा याविषयी विवेचन केले. तर दुसऱ्या सत्रात गोवा फार्मसी कॉलेजचे प्रा.डॉ.आनंद महाजन यांनी लिक्विड क्रोमॅटोग्राफी  व मास स्पेक्ट्रोमेट्री या तंत्राचा उपयोग इम्प्युरीटी प्रोफाइलिंग (अशुद्धतेचे वर्णन) करण्यासाठी कसा होतो याचे महत्व विशद केले.

या परिषदेत भारतातील विविध राज्यांमधून शोधनिबंधपर भित्तिपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातून आलेल्या भित्तीपत्रकांचे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवीसह डॉक्टरेट या विभागांत वर्गीकरण करण्यात आले. या शोधनिबंधांचे निरीक्षण करून त्यातील उत्कृष्ट सादरीकरणाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्हासह रोख बक्षीस देण्यात आले.

यामध्ये प्रथम पारितोषिक रु. २५००- ओम प्रकाश दाभोळकर, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, व्दितीय पारितोषिक रु. २०००- काळोजी पुरुषोत्तम, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, तृतीय पारितोषिक रु.१५००- मोहिनी तावडे, डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, चतुर्थ पारितोषिक रु. १०००- ओंकार सूर्यवंशी, शासकीय फार्मसी महाविद्यालय, रत्नागिरी, पाचवे पारितोषिक रु.७५० अथर्व परब, यशवंतराव  भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसी तर उत्तेजनार्थ प्रमाणपत्र सालस कामत, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व मंथन सावंत, यशवंतराव  भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसी यांनी मिळवले.

परिषदेला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोंसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई ,प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होते. परिषदेचे यशस्वी नियोजन मुख्य संयोजक आणि प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहन बारसे, डॉ.गौरव नाईक, प्रा.तुषार रुकारी यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.गौरी भिवशेठ यांनी केले.