विनापरवाना वाळू वाहतूक प्रकरणी ६ लाखांचा दंड

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 29, 2023 20:00 PM
views 198  views

कणकवली : अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कणकवली तहसीलदारांनी चार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपरवर कारवाई केली. विनापरवाना वाळू वाहतूक प्रकरणी ४ वाहनांना ६ लाख २ हजारांचा दंड केल्याची माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. ही कारवाई महसूलचे पथकाने आचरा रोडवरील बिडवाडी फाटा येथे ३ ट्रक व कलमठ येथे एका डंपरवर कारवाई केली.या चार वाहनांवर ६ लाख २ हजारांचा दंड आकारणी करण्यात आला आहे.

या पथकात मंडल अधिकारी शंकर पाटील,संतोष नागावकर व तलाठी उपस्थित होते. कलमठ व कणकवली भागात रत्नागिरीच्या दिशेने वाळू घेऊन जाणारे तीन ट्रक व एक डंपर ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली वाहने कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभी करून ठेवण्यात आली आहेत. तर कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, किरण मेथे आदींच्या पथकाने मसुरकर किनई रोडवर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत हा डंपर तहसीलदार कार्यालयाच्या स्वाधीन केला. मात्र, या डंपर वर अद्यापही दंड आकारला नाही,त्यावर उद्या दंड करण्यात येणार असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले. या अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.