भिरवंडे गावातील रस्त्यांसाठी 55 लाख रुपये मंजूर

सतीश सावंत यांच्या प्रयत्नाला यश
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 14, 2023 15:01 PM
views 210  views

कणकवली : महाविकास आघाडी सरकारमधील सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या प्रयत्नाने भिरवंडे गावातील विविध रस्त्यांसाठी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने या कामांना स्थगिती दिली होती. मात्र या रस्त्यांच्या कामाला दिलेली स्थगिती उठविण्याचा निर्णय हायकोर्टाने दिल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

भिरवंडे गावातील रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पाठवला होता. त्यानुसार मातोश्री वृद्धाश्रम ते भिरवंडे रामेश्वर मंदिरपर्यतच्या रस्त्यासाठी ३० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या या निधीला नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने जूनमध्ये स्थगिती दिली होती. मात्र, तत्पूर्वी या रस्त्याच्या टेंडर प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. तसेच भिरवंडे रामेश्वर मंदिर ते मुरडीवेवाडी आणि भिरवंडे रामेश्वर मंदिर ते हनुमंत वाडी या दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी दहा लाख तर गांधीनगर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर रस्त्याच्या कामासाठी 5 लाख रु चा निधी मंजूर झाल होता. स्थगितीमुळे या रस्त्यांची कामे  रखडलेली होती. मात्र, ज्या रस्त्यांना जिल्हा परिषद अंतर्गत प्राप्त निधीला स्थगिती देण्यात आली होती, अशा रस्त्यांची स्थगिती हायकोर्टाच्या निर्णयामुळे उठवल्यानंतर आता भिरवंडे गावातील चारही रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.


सतीश सावंत यांच्या प्रयत्नातून या  रस्त्यांसाठी  निधी प्राप्त झाला असून लवकरच या रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. भिरवंडे गावातील रस्त्याला निधी दिल्याबद्दल तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते सतीश सावंत यांचे आभार मानत असल्याचे भिरवंडे सरपंच नितीन सावंत यांनी सांगितले.