दुर्मिळ रक्तगटाच्या ५ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

Edited by: विनायक गांवस
Published on: August 04, 2024 14:10 PM
views 185  views

सावंतवाडी : गोवा राज्यातील जोस्विंन परेरा या महिला रुग्णाला गोवा-बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ए-निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या ५ रक्तदात्यांनी रक्तदान करत जीवदान दिले. या महिलेची ही तिसरी बायपास शस्त्रक्रिया होती. यासाठी सहा ते सात रक्तदात्यांची गरज होती. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी सहकारी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ, जिल्हा सहखजिनदार अमेय मडव आणि गोवा समन्वयक संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच रक्तदात्यांशी संपर्क साधत केवळ अर्ध्या तासात दुर्मिळ रक्तगटाचे पाच रक्तदाते उपलब्ध करून दिलेत. संबंधित महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी नितिन परब-तळवडेकर (मातोंड, वेंगुर्ला) यांनी त्यांचे वैयक्तिक १२ वे, पराग पडवळ (शिरोडा, वेंगुर्ला) यांनी २१ वे, साई कदम (वेताळबांबर्डे, कुडाळ), सुमित राणे (रेडी, वेंगुर्ला) यांनी २२ वे रक्तदान केले. तसेच समीर पाटकर (मालवण) यांनी पहिलेच प्लेटलेटदान केले तर यापूर्वी त्यांनी १२ वेळा रक्तदान केले आहे. या केससाठी दिगंबर मायबा (मालवण) हे सुद्धा रक्तदानास गेले होते. मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही. नातेवाईकांमार्फत जेफिन जॉर्ज (गोवा) यांनी रक्तदान केले.