रेडी माऊली मंदिराच्या विकासकामांसाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

रेडी माऊली देवस्थान कमिटीने मानले भाजपचे आभार
Edited by: दिपेश परब
Published on: March 12, 2023 09:37 AM
views 219  views

वेंगुर्ला: 

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ - २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९ लक्ष एवढा निधी सन २०२२ - २३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८.९६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून , वेंगुर्ले तालुक्यातील रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी , तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे यासाठी २.५० कोटी अशापद्धतीने ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे .

  राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सदर कामांना मंजुरी दिली , तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सदर कामांना पक्षाच्या वतीने शिफारस दिली होती व पाठपुरावा केला. याबद्दल रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त व मानकरी यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले. तर भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देऊन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, प्रमोद जठार यांचे तर याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या कोकणसाद लाईव्हचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.


   यावेळी रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त संदिप राणे , जि.प.सदस्य  प्रीतेश राऊळ , देवस्थान चे मानकरी भानुदास राणे , आत्माराम राणे , सुहास राणे , अमोल राणे , कृणाल पिळणकर , प्रल्हाद रेडकर  तसेच ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस उपस्थित होते. रेडीची सुकन्या विश्रांती नाईक हिने सुद्धा यासाठी खूप पाठपुरावा केला.