5 कोटीची व्हेलची उलटी जप्त !

दोघांना अटक !
Edited by: संदीप देसाई
Published on: May 08, 2024 13:17 PM
views 533  views

मालवण : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ७ मे ला तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचुन घराच्या बाजूला लपवून ठेवलेला ५ किलो ७० ग्रॅम वजनाचा व्हेल माशांच्या उलटी सदृश्य पदार्थ (अंबर ग्रीस) जप्त केला आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विक्री करण्यासाठी आणून ठेवला पदार्थ व्हेल माशांच्या उलटी सदृश्य असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहीतीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचुन एका संशयिताला ताब्यात घेवुन त्याच्या राहत्या घराच्या बाजूला हा पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दराप्रमाणे मिळालेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत ५ कोटी ७ लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींविरुध्द मालवण पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे यांनी केली.