भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड

मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
Edited by:
Published on: January 27, 2025 19:55 PM
views 200  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड झाली.

कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व शासकीय तंत्रनिकेतन मालवण या दोन्ही संस्थाचे एकूण १२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पैकी ५९ विद्यार्थ्यांची निवड कंपनीतर्फे करण्यात आली. यात ४४ विद्यार्थी हे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आहेत. कंपनीतर्फे या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली. ही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यासाठी कॉलेजतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर उपस्थित होते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करताना नवीन कौशल्ये शिकून घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. येणारा काळ हा आव्हानांचा आहे. एआय आणि रोबोटीक्सच्या प्रगतीमुळे तुमचे नॉलेज अद्यायवत असायला हवे. इंडस्ट्रीच्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा. तरुण वय ही तुमची जमेची बाजू आहे. कॉलेजने व कंपनीने एक चांगली संधी मिळवून दिलेली आहे. तिचा उपयोग करत स्वतःचे भवितव्य उज्वल घडवा असे ते म्हणाले. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कॅम्पसमार्फत नोकऱ्या मिळवून देण्यात कॉलेज यशस्वी ठरत आहे. ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख मिलिंद देसाई आणि कोऑर्डीनेटर महेश पाटील व श्रुती हेवाळेकर उपस्थित होते.