
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील 434 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून, यामध्ये 314 कार्यरत आणि १२० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
खेबुडकर यांनी सांगितले की, राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. या निर्णयाचा थेट फायदा जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार असून, वेतनश्रेणीतील सुधारणा लागू झाल्यापासूनचा फरक देखील त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा गणपती सण खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे.
लाभार्थी कर्मचाऱ्यांची विभागवार संख्यावार माहिती पुढीलप्रमाणे आहे:
आरोग्य पर्यवेक्षक:
कार्यरत – 16
सेवानिवृत्त – 13
एकूण – 29
आरोग्य सहाय्यक (पुरुष):
कार्यरत – 55
सेवानिवृत्त – 14
एकूण – 69
आरोग्य सेवक (पुरुष):
कार्यरत – 131
सेवानिवृत्त – 10
एकूण – 141
आरोग्य सेवक (महिला):
कार्यरत – 112
सेवानिवृत्त – 83
एकूण – 195
एकूण लाभार्थी – 434
सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गेल्या काही काळात सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने सुधारित आदेश जाहीर करत या कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. वेतनश्रेणीतील फरक मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार असून, अनेकांच्या सणासुदीच्या खरेदीला यामुळे गती मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांतून स्वागत करण्यात येत आहे.