10 वीतील गुणवंतांना कै. सुशीलाबाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषिके प्रदान

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 17:45 PM
views 60  views

सावंतवाडी : तालुक्यातून दहावीच्या शालान्त परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा तसेच सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचा कै. सुशीलाबाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषिक देऊन नुकताच गौरव करण्यात आला. २०२० पासून ही पारितोषिक देण्याचा संकल्प कै. सुशीलाबाईंचे चिरंजीव कै. पुरुषोत्तम, कै. अरविंद व श्री प्रबोध यांनी केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कै. सुशीला शिरोडकर यांनी उच्च शिक्षण घेतले. तत्कालीन समाज व्यवस्थेत स्त्री शिक्षणाचा पुरेसा प्रचार, प्रसार झालेला नव्हता. मात्र त्या स्त्री शिक्षणाच्या पाईक होत्या. मुंबईतील झेविअर कॉलेज मध्ये शिकलेल्या पूर्वाश्रमीच्या तारा पंडित यांचा १९२५ ला सावंतवाडीतील स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार मेघश्याम शिरोडकर यांच्याशी विवाह झाला आणि त्या सावंतवाडीकर बनल्या. सावंतवाडीतून प्रसिद्ध होणाऱ्या कै. मेघश्याम शिरोडकर यांच्या वैनतेय साप्ताहिकाच्या उभारणीत व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मेघश्याम उर्फ आबा शिरोडकर यांच्या सुविद्य पत्नी कै. सुशीलाबाई यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

साता-यात प्रति सरकार स्थापन करणारे क्रांतीसिंह नाना पाटील, सेनापती बापट, राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना.ग. गोरे, नाथ पै यांच्यासारखे स्वातंत्र्यसैनिक आणि वि.स. खांडेकर, कवी यशवंत, माधव जुलियन, गिरीश, व कवि बा.भ. बोरकर यांच्यासारखे साहित्यिक अशा अनेक थोरांचे आतिथ्य त्यांनी केले होते. सामान्य गरिब विद्यार्थ्यांबाबत त्यांना कणव होती. अनेक हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला त्या सतत हातभार लावीत. याच भावनेतून प्रदान केल्या जाणाऱ्या कै. सुशीलाबाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषिकांचा वितरण सोहळा १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मळगाव हायस्कूल येथे संपन्न झाला.

सावंतवाडी तालुक्यातून प्रथम आलेल्या मिलाग्रीज हायस्कूलचा विद्यार्थी कु. चैतन्य गावडे याच्या वतीने त्याच्या मातोश्री श्रीमती रेखा गावडे यांनी  मुख्याध्यापक श्री फाले यांचेकडून ₹१०,००० चे रोख पारितोषिक, कै. सुशीलाबाई मेघश्याम शिरोडकर स्मृति चिन्ह, व प्रशस्तिपत्रक स्वीकारले. शिरोडकर कुटुंबियांच्या वतीने हजर असलेल्या दत्तप्रसाद गोठोसकर यांनी ₹७,५०० चे रोख पारितोषिक, स्मृति चिन्ह, व प्रशस्तिपत्रक देऊन मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मळगाव हायस्कूलच्या कु. सुचित्रा धुरी हिचा सत्कार केला.कायम स्वरूपात हे वार्षिक पारितोषिक सुरु करण्यामागचा हेतू सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांत, आणि खास करून मुलींमध्ये, ज्ञानलालसा वाढावी व त्यांच्या मनात अभ्यासात उत्तुंग यश मिळवण्याची इच्छा जागृत व्हावी असा आहे.