मालवणात हत्तीरोगाचे ४ रुग्ण | सहाय्यक संचालकांनी घेतला आढावा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 27, 2024 14:08 PM
views 39  views

मालवण : शहरात हत्तीरोगाचे ४ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाचे कोल्हापूर परिमंडळ सहाय्यक संचालक डॉ. दीपक माने यांनी आज मालवणात हजर होत मालवण नगरपालिकेत आढावा बैठक घेऊन आरोग्य विभाग, नगरपालिका जिल्हा हिवताप कार्यालय यांच्याकडून मालवणात सुरु केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. तसेच डॉ. माने यांनी शहरात स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थेची पाहणी करून प्रत्यक्ष रुग्ण भेट घेऊन उपचाराची माहिती घेतली. हत्तीरोगाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी करणे, रक्त नमुने संकलन करणे याबाबत सूचना देऊन याबाबत नागरिकांमध्येही जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.

मालवण शहरात हत्तीरोगाचे रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासनाकडून विविध उपाययोजना मालवण शहरात राबविण्यात येत आहेत. काल आम. वैभव नाईक यांनी मालवणात या उपाययोजनांचा आढावा घेत आरोग्य विभागाचे कोल्हापूर परिमंडळ सहाय्यक संचालक डॉ. दीपक माने यांच्याशी संपर्क करून त्यांना मालवण मध्ये येऊन आढावा घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज सकाळी आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. दीपक माने यांनी मालवणात दाखल होत नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. स्वप्निल बोदमवाड, तहसीलदार वर्षा झाल्टे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. संजय पोळ, मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे आदी व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. दीपक माने यांनी आरोग्य विभाग, नगरपालिका, जिल्हा हिवताप कार्यालय यांच्याकडून केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. 

या दरम्यान डॉ. दीपक माने यांनी मालवण शहरातील सोमवार पेठ येथे प्रत्यक्ष रुग्ण भेट देऊन उपचाराबाबत पाहणी केली. तसेच स्वच्छतेबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहरामधील सांडपाणी व्यवस्था व गटाऱ यांची पाहणी करून याबाबत मालवण नगरपालिका व आरोग्य विभाग यांना डास प्रतिबंधक उपाययोजना करून अळी नाशक फवारणी व धूर फवारणी करणे तसेच नियमित रक्त संकलन करणे याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांमध्ये हत्तीरोग या आजाराची जनजागृती करावी, जनजागृती साठी ८ हजार हस्तपत्रिका देण्यात आलेल्या आहेत, त्याचे वाटप नागरिकांना करावे, अशा सूचना डॉ. माने यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य सहाय्यक व पर्यवेक्षक यांना सूचना दिल्या. या अंतर्गत शहरात जनजागृतीचे ६ बॅनर्स सर्वाजनिक ठिकाणी लावण्यात आले. 

तसेच सर्वेक्षण पथकांनी रात्री ८ ते रात्री १२ या कालावधी मध्ये नागरिकांचे रक्त संकलन करावे, सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या भागामध्ये सूचना द्याव्यात, औषध साठा पुरेशा प्रमाणात ठेवावा, या सर्व उपाययोजनांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असेही डॉ. माने यांनी स्पष्ट केले.