33 वर्षे दीपोत्सवाची परंपरा ; भेडशी मंडळाचा मंत्री केसरकर, खासदारांनी केलं कौतुक

मालवणी हास्यसम्राटांच्या उपस्थितीने यादगार
Edited by: संदीप देसाई
Published on: November 22, 2023 19:39 PM
views 94  views

दोडामार्ग :  सलग  33 वर्षे दीपावली उत्सव कार्यक्रम दरवर्षी भेडशीत साजरा होतोय, या मंडळाच्या  कार्याचा आपल्याला अभिमान वाटतो. असे गौरवोद्गार काढत मालवणी भाषेतूनच उपस्थित ग्रामस्थ, रसिक, प्रेक्षकांना खासदार विनायक राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.

  दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे  दीपोत्सव समिती आयोजित दीपरंग महोत्सव 2023 च्या कार्यक्रम  प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी  समितीच्या पदाधिकारी,सदस्य, ग्रामस्थ यांचे कौतुक करत मागील 33 वर्षांपासून सुरू असलेल्या  दीपोत्सव कार्यक्रम करणाऱ्या  मंडळाच्या कार्याचे  कौतुक केले. तर पुढे बोलताना म्हणाले  तर काही मंडळे स्थापन होतात कालांतराने बंद पडतात मात्र सलग 33 वर्षे यशस्वीपणे सुरू असलेल्या भेडशी दीपोत्सव समितीने   बाकीच्या मंडळांसमोर वेगळा आदर्श  घालून दिला आहे ही गावची, गावातील ग्रामस्थांची, युवकांची एकजूट आहे असे सांगितले.


 दीपोत्सव समिती भेडशी दरवर्षी दीपावलीत विविध सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी खास आकर्षण म्हणून दिपरंग महोत्सव 2023 चे आयोजन करून मालवणी नाट्यसम्राट, सिने अभिनेता दिगंबर नाईक यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. तसेच गोव्यातील प्रसिद्ध "द रागा म्युझिक बँड" च्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात प्रसिद्ध विविध पुरस्कार मिळविलेल्या गायकांचा समावेश होता.


 दिपरंग महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन भेडशी गावचे मानकरी वासुदेव (दादा) महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी दिपोत्सव समिती अध्यक्ष सिद्धेश डांगी, उपाध्यक्ष रामचंद्र भणगे, दीपोत्सव समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी,  जेष्ठ ग्रामस्थ अनिल मोरजकर, कालिदास भणगे, नंदकिशोर टोपले, नंदकिशोर टोपले, नंदकिशोर म्हापसेकर,रामचंद्र भिसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

    श्रीफळ वाढवून  उद्घाटन केल्यानंतर खासदार विनायक राऊत  यांच्या हस्ते व मालवणी हास्यसम्राट दिगंबर नाईक यांच्या उपस्थितीत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेपुष्पहार घालून  कार्यक्रमाची सुरुवात केली.


यावेळी दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेतून रसिकांशी संवाद साधला रसिकांनीही त्यांना भरभरून दाद  दिली. त्यानंतर त्यांनी मालवणीत गाऱ्हाणे घालत रसिकांच्या हृदयाला हात घातला व विविध मालवणी किस्से, म्हणी, विनोद सांगत सर्वांचीच वाहवा मिळविली.

   त्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध "द रागा म्युझिक बँड" यांचा  संगीताचा कार्यक्रम पार पडला. या त्यांच्या संचामध्ये विशेष नावलौकिक प्राप्त  केलेल्या या संचामध्ये सूर नवा ध्यास नवा फेम 2022 गायक नवाब शेख, कोकणची महागायिका नेहा आजगावकर, गोवन व संकल्प आयडॉल प्राप्त गायक अक्षय नाईक यांनी एकापेक्षा एक अशी दर्जेदार हिंदी, मराठी,गाणी नाट्यगीत,लावणी गीत सादर करून त्यांच्या साथीला दिपरंग कार्यक्रम पहाटेपर्यंत जागवला.रसिकप्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे अँकरिंग अक्षय सातार्डेकर यांनी  केले.

मंत्री दीपक केसरकर यांचीही  उपस्थिती

दरम्यान शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी  रात्री उशिरा भेडशी येथे दिपरंग महोत्सवाला उपस्थिती लावली व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांचे  दीपोस्तव समितीकडून त्यांचे स्वागत  करण्यात आले. यावेळी त्यांनी शुभेच्छापर मनोगतात बोलताना श्री.केसरकर यांनी दीपोत्सव समिती भेडशीच्या उपक्रमाचे कौतुक करीत भेडशी गावाने आजपर्यंत एक वेगळेपण जपले असल्यामुळे सलग ते 33 वर्षे दीपोत्सव सारखा कार्यक्रम सुरू आहे. या मंडळाचे, पदाधिकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. तसेच तालुक्यातील सुरू असलेली  विकास कामे व भविष्यात होऊ घातलेल्या  विकास कामांबाबत त्यांनी भाष्य करून सर्वांचा विकास साधत असताना प्रामुख्याने महिला बचत गट व युवकांना रोजगार निर्मितीसाठी काम करणार असून तालुक्यातील बंद असलेले उद्योग केंद्र सुरू करणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले.


दीपोत्सव समिती कडून यावर्षी  आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच या समितीच्या सुरुवातीपासून  योगदान देणाऱ्या गावातील भानुदास गवंडळकर व नरेंद्र सरवणकर यांचा  ज्येष्ठ ग्रामस्थ नंदकिशोर म्हापसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा सन्मान करण्यात आला. दीपोत्सव समिती अध्यक्ष  सिद्धेश डांगी यांनी आपल्या मनोगतात  दीपोत्सव समिती आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  गावातील ग्रामस्थ, युवक यांचे मोठे सहकार्य आहे तसेच या सर्व कार्यक्रमासाठी आर्थिक, आदी भार उचलणारे स्थानिक तसेच बाहेरील देणगीदार यांच्यामुळे शक्य आहे त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदेव मणेरकर यांनी केले.