
सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा देणारा घटक या भूमिकेतून काम करताना जनतेची कामे तातडीने आणि पारदर्शकपणे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
लोकाभिमुख प्रशासन, जलद सेवा वितरण आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुशासन सप्ताह अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वराळे, आरती देसाई, वक्ते श्री वळंजू तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेत बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, आपण नागरिकांना कोणत्या सेवा देतो, त्या किती जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहेत, तसेच त्या अधिक प्रभावी कशा करता येतील यावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास टिकवणे हे आपल्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर वेळेत निर्णय घेणे, हेच खरे सुशासन आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना कालमर्यादा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी श्री वळंजू यांनी उपस्थितांना सुशासन याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासनातील कामकाजाचा संदर्भ देत ते म्हणाले की, एखादी फाईल अडकल्यास काय वाटते, याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. एका विभागातून दुसऱ्या विभागात अभिप्रायासाठी फाईल फिरत राहणे, निर्णयास होणारा विलंब अशा अनेक याच समस्यांना सामान्य नागरिकही रोज सामोरे जात असतात. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न विहित कालावधीत निकाली काढणे किंवा पुढील टप्प्यावर नेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, याची जाणीव सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावी, असे आवाहनही श्री वळंजू यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी श्रीमती वराळे यांनी तर सूत्रसंचलन श्रीमती राजश्री सामंत यांनी केले.










