३०४ महिला व ७ पुरूष उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 28, 2024 15:07 PM
views 35  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या रिक्त असलेल्या पदांवर सध्या भरती प्रक्रिया सुरू असून, भरती प्रक्रियेच्या आजच्या नवव्या दिवशी एकूण 304 महिला उमेदवार तर 7 पुरुष उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. या सर्वांची मैदानी चाचणी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ११८ पोलीस शिपाई (५ बॅन्डस्मन सह) रिक्त पदांकरीता आज  ५२९ महिला व ३१ पुरूष असे एकूण ५६० उमेदवार शारिरीक चाचणी, मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणी याकरीता बोलाविण्यात आलेले होते. आज प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेसाठी ३८० महिला व ७ पुरूष उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ३०४ महिला व ७ पुरूष उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. मैदानी चाचणीसाठी योग्य असल्याची खात्री करुन तसेच, उमेदवारांची योग्य दक्षता घेऊन मैदानी चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे. उमेदवारांची कोणतीही गैरसोय झालेली नाही.

ज्या उमेदवारांनी विविध पदांकरीता विविध जिल्ह्यांमध्ये आवेदन अर्ज भरलेले आहेत व त्यांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदाकरीता प्रवेशपत्र निर्गमीत झालेले आहेत. तसेच, महा-आयटी कडून तांत्रिक कारणास्तव प्रवेशपत्र उशिरा प्राप्त झाल्याने या जिल्हयातील भरतीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी योग्य पुरावा सादर केल्यास त्यांना दि. ०१/०७/२०२४ व दि. ०२/०७/२०२४ रोजी भरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, भरती प्रक्रियेच्या कालावधीत कोणीही उमेदवार भरतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.