पावसाळ्यात कोकण मार्गावर ‘वंदे भारत’च्या आठवड्यातून 3 फेऱ्या

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 07, 2025 15:54 PM
views 630  views

सिंधुदुर्ग  : कोकण मार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांच्या मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस चालवण्यात यावी, अशी कोकण विकास समितीने मागणी केली होती. या सुपरफास्ट एक्स्प्रेसला अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

कोकण मार्गावर धावणारी २२२२९/२२२३० क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात ३ दिवस धावते. एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस चालवण्यासाठी कोकण विकास समितीने आग्रह धरत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य होणार नसल्याचे स्पष्ट करत एक्स्प्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर परतीच्या प्रवासात मंगळवार, गुरुवार व शनिवारी हे तीनच दिवस धावेल.

११०९९/१११०० क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ४ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार शुक्रवार व रविवारी तर परतीच्या प्रवासात शनिवारी व सोमवारी धावेल. २२११९/२२१२० क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळवार, गुरुवार व शनिवारी तर परतीच्या प्रवासात बुधवार, शुक्रवार व रविवारी धावेल.