
दोडामार्ग : तळकट येथे गोवा बनवाटीची अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर दोडामार्ग पोलिसांनी सोमवारी रात्री ८:३० वा.च्या सुमारास कारवाई केली. यावेळी वाहन व दारू मिळून एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित गुंडु सटुप्पा तरवाळ (४२) व जोतिबा मायाप्पा पोवार (५५, दोघेही रा. मलतवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
तळकटमार्गे दारू वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, सहाय्यक फौजदार गवस, हवालदार रामचंद्र मळगावकर, पोलीस विजय जाधव हे गस्त घालत होते. दरम्यान एक मारूती सुझुकी ओमनी गाडी या मार्गावरून येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती गाडी तपासणीकरीता थांबवली. गाडीची झडती घेतली असता गाडीत प्रत्येकी १०० रुपये किमतीच्या गोल्डन एस ब्लु फाईन व्हिस्की लेबलच्या १८० मिली मापाच्या ११०४ बाटल्या, प्रत्येकी १०० रु किमतीच्या हनी ग्रेड ब्रॅंडी लेबलच्या १८० मिली मापाच्या ९६ बाटल्या अशी मिळून १ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीचे बिगर परवाना दारू आढळली. पोलिसांनी अवैध दारू व वाहतुकीसाठी वापरलेली २ लाख रुपये किमतीची ओमनी गाडी असा एकूण ३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिगर परवाना दारूची वाहतुक केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (अ),(ई), ८१, ८३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अतिरीक्त अधिक्षक कृषीकेश रावले व उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास पोलिस हवालदार गवस करत असल्याची माहिती ओतारी यांनी दिली.