
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उद्या मंगळवार 21 नोव्हेंबर पासून 24 तास कायम स्वरूपी 3 डॉक्टर देण्याच्या लेखी आश्वासन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्स्क श्याम सावंत यांनी दिल्यानंतर सोमवारी सर्वपक्षीयांनी छेडलेले रुग्णालय बंद आंदोलन दुपारी मागे घेण्यात आले. येत्या 15 डिसेंबर रोजी जिल्हा वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या डॉक्टर संख्येमुळे दोन दिवसांपूर्वी एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला होता. याला पूर्णपणे आरोग्य विभागचं जबाबदार आहे असे म्हणत सर्व पक्षी्यांनी रुग्णालंय बंद करण्याचा इशारा बाळा नाईक व टीमने दिला होता. त्यानुसार सोमवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आल. आंदोलनावेळी आलेले अतिरिक्त शल्य चिकित्स्क श्याम सावंत यांना आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरत प्रश्नाची सरबत्ती केली. या रुग्णालयात एकही डॉक्टर नाही मग या रुग्णालायची काय गरज काय? सध्या उपचार घेत असलेल्या त्यां रुग्णाना आम्ही गोव्यात उपचारासाठी नेतो. आपण या रुग्णालायाला कुलूप लावा व बंद करा, काहीही गरज नाही असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी सभापती लक्ष्मण (बाळा) नाईक, उबाठा उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, भाजप माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, पराशर सावंत, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, उ बा. ठा सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, माटणे सरपंच महादेव गवस, नगरसेवक रामचंद्र मनेरकर,नितीन मणेरीकर, नगरसेविका गौरी पार्सेकर, संजना म्हावळणकर, क्रांती जाधव, स्वराली गवस, सुनील गवस, दिनेश नाईक, दीपक गवस, शाणी बोर्डेकर, पिकी कवठणकर, वैभव इनामदार शुभम गवस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वपक्षीय आंदोलन जरी पुकारण्यात आले असले तरी या आंदोलन पासून शिंदे शिवसेना पूर्णपणे दूर होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षही दूर असल्याचे दिसून आले.
3 डॉक्टर 24 तास रुग्णालायाला सेवा देणार
सोमवारी छेडलेल्या आंदोलनानंतर स्त्रीरोग तज्ञ डॉ. एवळे, डॉ. धीरज सावंत, वैद्यकीय अधिकारी आकाश एडगे या तीन डॉक्टरांची कायम स्वरूपी म्हणजे 24 तास नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हे 3 डॉक्टर या रुग्णालयात सेवा देणार आहेत. त्यामुळे आजच्या आंदोलना नंतर आरोग्य विभागला जाग आल्याची यावेळी दिसून आले.
एक्स रे तज्ञ कपिल ओहाळे यांना घेतले फैलावर
ग्रामीण रुग्णालयात एक्सरे सेवा देणारे डॉ. कपिल ओहाळे हा येणाऱ्या रुग्णांबरोबर मनमानी कारभार करतात. आपल्या कामाच्या वेळेत तो कधीही रुग्णालयात हजर नसतो. त्यामुळे रुग्णांना तासंतास रुग्णालयात बसून रहावे लागते, यावेळी ओहाळे याला प्रश्नाची भडीमार करत आंदोलनकर्त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
डॉ. सावंत यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
आंदोलना वेळी आंदोलनास सामोरे जाण्यासाठी आलेल्या अतिरिक्त शल्य चिकित्स्क डॉ. श्याम सावंत यांच्याकडे आंदोलकर्त्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एक एक्सरे त्यांना दाखवत या एक्सरे मध्ये सबंधित रुग्णाला कोणता आजार आहे हे तुम्ही सांगा बघू? असा प्रश्न केल्यानंतर शल्य चिकित्स्क सावंत यांनी आपण त्वचारोग तज्ञ आहे, त्यामुळे मला या एक्सरे विषयी एवढी माहिती नसल्याचे सांगून वेळ मारून नेली.