
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज छाननी प्रक्रिया गुरुवारी कणकवली तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये तीन जणांचे अर्ज अवैध ठरले. याचाच परिणाम म्हणजे बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघ भाजपसाठी बिनविरोध झाला आहे. तालुक्यात तीन ठिकाणी एकाच उमेदवाराचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने यातील एक अर्ज आपोआपच रद्द झाला आहे. त्यामुळे आता 91 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जानवली पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार अनिता गजानन चव्हाण यांनी अर्जासोबत शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवला गेला. बिडवाडी पंचायत समितीच्या उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या विजय शिंदे यांना 2001 नंतर तीन अपत्ये झाल्याची बाब भाजपच्या उमेदवाराने निदर्शनास आणली. त्यामुळे विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवला गेला. तर लोरे नंबर १ पंचायत समिती मतदार संघातील उबाठा शिवसेनेच्या उमेदवार सिद्धीशा सिद्धेश राणे या कुडाळ पंचायत समितीच्या मतदार असल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरवला गेला.
तालुक्यातील कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातून वैदही गुडेकर, कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून नीरज मोरये, नांदगाव पंचायत समिती मतदार संघातून प्राची मोरये यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने त्यातील एक अर्ज आपोआप रद्द करण्यात आला. त्यामुळे 91 उमेदवारांचे 91 अर्ज व इथे ठरले आहेत.










