
वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शनिवारी दि.२७सप्टेंबर रोजी वैभववाडी येथील मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात तालुक्याचा सहकार मेळावा होणार आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री.रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपाध्यक्ष अंबाजी हुंबे, बँकेचे माजी संचालक दिगबंर पाटील, सीमा नानीवडेकर, महेश रावराणे,पुंडलिंक पाटील, उज्वल नारकर, सिध्देश रावराणे आदी उपस्थित होते.
श्री.रावराणे म्हणाले २७ सप्टेंबरला संघाची सर्वसाधारण सभा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयानजीक असलेल्या मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात होणार आहे. या सभेनंतर तालुक्याचा सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच सेवा पंधरावडातर्गंत सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला जाणार आहे. सहकार मेळाव्याला तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
तसेच त्यांनी यावेळी तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक उलाढालीची माहिती दिली. संघाने गेल्या काही वर्षात अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन मार्गक्रमण केले आहे. गेल्या वर्षभरात संघाने रासायनिक खत विक्रीतुन १ लाख ७२ हजार ३०५,भात बी बियाणे विक्रीतुन ६ लाख ५ हजार १९५ रूपये, सेंद्रीय खते विक्रीतुन ३ लाख २१ हजार २०९ रूपये, किटकनाशके विक्रीतुन १ लाख ६६ हजार २२० रूपये, शेती अवजार विक्रीतून १ लाख ६६ हजार ३०५ रूपये, पशुपक्षी खाद्यविक्रीतुन ९ लाख ६५ हजार ५ रूपये आणि भात खरेदीतुन १ कोटी ९९ लाख ८ हजार ९०० रूपये अशी ३ कोटी १४ लाख २८ हजार १३९ रूपयांची उलाढाल केली आहे.यातुन संघाला ३ लाख ५८ हजार ३०४ रूपये इतका निव्वळ नफा झाला आहे.










