
चिपळूण : यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण करून सोडले. ऐन भात कापणीच्या तोंडावरच पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून चिपळुणात २७ हेक्टर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
दसऱ्यापासून भातशेती कापणीसाठी तयार झालेली असतानाच यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला आहे. चिपळूण तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांचे सुमारे २७ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. ऐन भात कापणीच्या कालावधीत हाता-तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. भातशेती दसऱ्यापासून तयार झाल्याने दिवाळीपूर्वी कापणी पूर्ण होईल अशी शक्यता होती. त्यादृष्टीने शेतकरीही तयारीत होता. मात्र दररोज कोसळणाऱ्या पावसामुळे तयारीवर पाणी फेरले गेले. त्यानंतर सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असतानाही चिपळूण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. रामपुर, मार्गताम्हाणे, पोफळी, शिरगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज पडल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात अंधार पसरलेला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत अनेकांच्या घरात वीज नव्हती. तालुक्यात काही दिवसांपासून अनियमित पावसामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यातील शेतकरी कुटुंबासाठी आवश्यक तेवढे धान्य पिकवतात. मात्र तेही पावसामुळे वाया गेल्याने बाजारातून धान्य विकत आणल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. जे शेतकरी खरेदी-विक्री संघाला भात विकतात त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य आहे. पावसामुळे तालुक्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्याचबरोबर मिळणारी
पंचनाम्यासाठी संपर्क साधा
भरपाईही तुटपूंजी असल्याने कोणी पंचनाम्याच्या फंदात पडताना दिसत नाही. तालुक्यात वीर गावातील ३१ शेतकऱ्यांचे ७.५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. देवपाठमधील २३ शेतकऱ्यांचे ४.६० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल मुंढे, तळसर, शिरगाव, वेहळे, अनारी, कापसाळ, भिले, केतकी, करंबवणे या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यानं काय करावे याचा प्रश्न पडला आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि दुसरीकडे बळीराजा पावसामुळे पीक वाया गेले या चिंतेत आहे.
शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी संपर्क साधा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले आहेत . तालुक्यात ६५ टक्के भातशेती कापण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील त्यांनी पंचनामे करून घ्यावेत. यासाठी तालुका कृषी त्यांनी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा.
शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण