जरांगेंच्या सभेला मालवणातून २५ हजार मराठा बांधव जाणार !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 21, 2023 17:21 PM
views 879  views

मालवण : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभेला मालवण तालुक्यातून सुमारे २५ हजार समाज बांधव जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी राठिवडे येथे आयोजित बैठकीत दिली. तसेच मालवण तालुक्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्याकडे देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.


मालवण तालुक्यातील राठिवडे येथील कृष्णविलास बॅक्वेट हॉलमध्ये मालवण तालुका मराठा समाज बांधवांची बैठक अॅड. सावंत यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी सुभाष धुरी, अभय भोसले, विनायक परब, अरुण भोगले, बाबा सावंत, प्रकाश कासले, शिवरामपंत पालव, शोभा पांचाळ, करुणा पुजारे, दिव्या धुरी, स्वप्नील पुजारे, बाळा सांडव, संदीप सावंत, डॉ. संभा धुरी व मालवण तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मराठा समाजाच्या मागणीसाठी लढणारे जररांगे-पाटील यांचा डिसेंबरच्या पहिल्या किंवा पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा दौरा जाहीर झाला असून फक्त तारीख निश्चित व्हायची आहे. यासाठी त्यांच्या सभेला व त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून एक ते दीड लाख तर मालवण तालुक्यातून सुमारे २५ हजार मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यासाठी मालवण तालुक्यातून बाबा सावंत यांच्यावर नियोजनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती अॅड. सावंत यांनी दिली. समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने जरांगे-पाटील यांच्या सभेला जाण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूत्रसंचालन सुभाष धुरी यांनी केले.