जीवदान विशेष शाळेचा २३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 14:49 PM
views 221  views

सावंतवाडी : सांगली मिशन सोसायटी संचलित जीवदान विशेष शाळा (मतिमंद प्रवर्ग), खानमोहल्ला, झाराप, ता. कुडाळ या शाळेची स्थापना १७ जुलै २००० रोजी झाली. या शाळेचा २३ वा वर्धापन दिन १९ जुलै २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्य क्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत सौ. शुभदादेवी सावंत भोसले या उपस्थित होत्या.

सर्व प्रथम शाळेतील दिव्यांग मुलांनी बॅंड वाजवून प्रमुख अतिथी यांचे स्वागत केले. त्यानंतर दिव्यांग मुलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शाळेतील विशेष शिक्षिका सौ. स्नेहा परब यांनी शाळेबाबतची सविस्तर माहीती सांगितली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी सास्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात दिव्यांग मुलांनी स्वागत गीत, ग्रुप डान्स, यांचे सादरीकरण केले. यानंतर शाळेतील विविध उपक्रमाची चित्रफित दाखविण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून सौ. शुभदादेवी सावंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, या शाळेतील मुलांचे कार्यक्रम व सर्व कर्मचा-यांची सेवाभावी वृत्ती पाहुन मी प्रभावित झाले. तुम्ही मदतीचा हाक केव्हाही द्या मी तुम्हाला मदत करायला तत्पर राहीन. आमच्या परिवारांचे शूभ आर्शिवाद सदैव आपल्या पाठीशी राहतील. यावेळी शाळेचे संचालक फादर सजी थॉमस, मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जोब, ब्रदर मिजो, सिस्टर रेसी, सिस्टर सिन्सीया, सौ. स्नेहा परब, सौ. तनया मोरजकर, श्री. हेमंत साळुंके, श्री. संजय हरमलकर, सौ. रश्मी रेडकर, सौ. ईशा सुर्याजी, श्री. भिवाजी आकेरकर, श्री. हरीश नलावडे, श्री. श्रीवदन आरोसकर, सौ. दुर्वा सावळ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मुलांचे पालक, या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन हेमंत साळुंके यांनी केले.

सध्या शाळेत ५४ मुले विशेष शिक्षण घेत असून जीवदान विशेष शाळेत दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुलांचे प्रवेश देणे सुरू झाले आहे. शाळेत मुला- मुलींची स्वतंत्र निवासी व्यवस्था, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, शालेय परिसर सी. सी. टी. व्ही. निगराणी खाली असून मुलांना स्पीच थेरपी, फिजीओथेरपी देण्यात येते.