दहा वर्षांत मुंबई - गोवा महामार्गावर २०१० जणांचे बळी, १६८५ अपघात

▪️ सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांची विधानसभेतील तारांकित प्रश्नावर माहिती
Edited by:
Published on: December 12, 2023 10:40 AM
views 173  views

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना विधानसभेत तारांकित प्रश्न विचारण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावर १२ वर्षात जवळपास १२ हजार अपघाती मृत्यू झाले असतानांही अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही हे खरे आहे का ? असा सवाल विधानसभा सदस्यांनी केला. यावर उत्तर देताना गृह विभागाच्या अहवालानुसार सदर महामार्गावर सन २०१३ ते २०२३ (ऑक्टोबर अखेर) या कालावधीत एकूण १६८५ अपघात घडले असून त्यात एकूण २०१० व्यक्ती अपघाती मृत्यू पावले आहेत अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत रुपये ४५०० कोटी इतकी रक्कम खर्च करुनही रस्त्याचे काम १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. हे खरे आहे का असा सवाल केला असता पनवेल कि.मी. ०/०० ते इंदापूर कि.मी. ८४/०० या लांबीसाठी केंद्र शासनाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एन.एच.ए. आय.) यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रुपये ५४० कोटी इतकी रक्कम दिलेली आहे. इंदापूर कि.मी. ८४/०० ते पात्रादेवी कि.मी. ४७१/३०० या लांबीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग (सा.बां.) यांचेमार्फत एकूण रुपये ३५२७.२५ कोटी इतका खर्च झालेला आहे. सद्य:स्थितीत काम प्रगतीत आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाचे रस्ते वाहतूक व महामार्ग, नवी दिल्ली यांचे नियंत्रणाखाली असल्याने रस्त्याच्या कामाचे लेखापरिक्षण हे केंद्र शासनाने नेमणूक केलेल्या लेखापरिक्षक, तसेच भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचेमार्फत वेळोवेळी करण्यात येते असं उत्तर मंत्री चव्हाण यांनी दिले.

महामार्गावरील बहादूरशेख नाका, चिपळूण येथील उड्‌डाणपुलाला निकृष्ट बांधकामामुळे तडे जावून तो क्रेनसह कोसळल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली. घटनेनंतर १२ तास उलटूनही विभागाचे एकही अधिकारी घटनास्थळी पोहचले नाहीत याबाबत विचारल असता हे खरे नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी घटना घडली त्यावेळी उपस्थित होते असं ते म्हणाले. उड्‌डाणपुलापासून १०० मीटरवर असलेल्या वशिष्ठी नदीवरील नवीन पुलालाही ठिकठिकाणी तडे गेल्याबाबत विचारलं असता, हे खरं नाही. वशिष्ठी नदीवरील पुल सुस्थितीत असून प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला कोणताही तडा गेलेला नाही. 

या महामार्गावरील पनवेल-कासू व कासू-इंदापूर या दोन टप्प्यातील ८४ किलोमीटरच्या रस्त्याचे काम सीटीबी अत्याधुनिक तंत्रज्ञान व मशिनरीच्या सहाय्याने सुरु असून १० सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने एकेरी मार्गिका वाहतुकीस खुली करण्याचे आश्वासन २०२३ मध्ये वा त्यादरम्यान देऊनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही यावर विचारलं असता. पनवेल ते कासू या लांबीमध्ये डाव्या बाजू कडील ८.७५ मी. रुंदीच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले होते व कासू ते इंदापूर या लांबीमध्ये ८.७५ मी. रुंदीच्या एका बाजूचे सी.टी.बी. द्वारे व अस्तित्वातील दोन पदरी रस्त्याचे डांबरीकरणाने दुरुस्ती करुन गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्यात आला होता. 

अपघातांची संपूर्ण प्रकरणांची शासनाने सखोल चौकशी करुन या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करणं तसेच या कामावरील खर्चाचे विशेष लेखापरिक्षण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. नसल्यास, विलंबाची कारणं काय आहेत ? असा सवाल केला. यावर सद्य:स्थितीत काम प्रगतीत आहे. प्रकल्प केंद्र शासनाचे रस्ते वाहतूक व महामार्ग, नवी दिल्ली यांचे नियंत्रणाखाली असल्याने  रस्त्याच्या कामाचे लेखापरिक्षण हे केंद्र शासनाने नेमणूक केलेल्या लेखापरिक्षक, तसेच भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचेमार्फत वेळोवेळी करण्यात येते असं मंत्रीमहोदय म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याबाबत आम. भास्कर जाधव, रविंद्र वायकर, संजय पोतनीस, वैभव नाईक, अजय चौधरी पृथ्वीराज चव्हाण, सुनिल प्रभू, ऋतुजा लटके, राजन साळवी, सुनिल राऊत, जयंत पाटील,डॉ. जितेंद्र आव्हाड, रमेश कोरगांवकर, प्रशांत ठाकूर, समीर कुणाबार, मनिषा चीधरी, महेश बालदी,अमित साटम, नाना पटोले, अस्लम शेख, सुभाष धोटे, अमिन पटेल, अबू आजमी आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे उत्तर दिले आहे.