शिरोड्यात अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनद्वारे 201 रुग्णांची तपासणी

जनजागृती मोहिमेला प्रतिसाद
Edited by: दिपेश परब
Published on: July 22, 2025 15:02 PM
views 147  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य  अभियाना अंतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून 201 रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आले. 

लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे व लक्षणे ओळखण्यास मदत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते ज्यामुळे रुग्णांचे जीवन वाचवता येते. 

आजच्या शिबिरात एकूण 201 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यात 60 महिलांची गर्भाशय ग्रीवा कर्करोगासाठी तर 160 महिलांच्या स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त 60 रुग्णांची via pap चाचणी 6 रुग्णांची  बायोप्सी व 201 रुग्णांची रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली व अन्य प्रयोगशाळा चाचण्याही घेण्यात आल्या. आरोग्य सुविधांसोबतच उपस्थितांचे आयुष्मान कार्ड देखील यावेळी काढून देण्यात आले ज्यामुळे त्यांना पुढील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. 

यावेळी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रवीण देसाई यांनी माहिती दिली की सर्व अधिकारी जिल्हा रुग्णालयातील व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संतोष खानविलकर,   स्त्री रोग तज्ञ डॉ.शेटकर, दंत शल्यचिकित्सक डॉ. मनेर.   एनसीडी स्टाफ गौरी बांदेकर, एनसीडी कौन्सिलर धनश्री नवाते, अधिसेविका जान्हवी कुशे, इन्चार्ज वराडकर सिस्टर यांच्या विशेष प्रयत्नामुळे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आजचे हे शिबिर यशस्वी झाले.

या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील लोकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली असून कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत समाजात जागरूकता वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे शासनाच्या या उपक्रमामुळे कर्करोगाशी लढण्यासाठी समाजाला अधिक सक्षम बनण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.