सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग नगरपरिषद विकासकामांना २० कोटी मंजूर

मंत्री दीपक केसरकरांचा यशस्वी पाठपुरावा
Edited by: विनायक गावस
Published on: March 15, 2024 13:43 PM
views 370  views

सावंतवाडी : सावंतवाडी,वेंगुर्ला व दोडामार्ग नगर पालिकांतर्गत रस्ते, डांबरीकरण, उद्याने आदी विविध नागरी सेवा सुविधांसाठी शासनाने तब्बल २० कोटींचा निधी मंजूर केला असून सावंतवाडी नगरपरिषदेसाठी ९ कोटी ७५ लक्ष, वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी ७ कोटी ७५ लक्ष व दोडामार्गसाठी २ कोटी ३० लक्ष निधी वितरीत होत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जनतेच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत हा निधी मंजूर करुन घेतला आहे.

शासनाने यावर्षी नगर विकास विभागाला ५०० कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला असून त्याद्वारे नगरपरिषदेस हा विकास निधी देण्यात येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या नगरपरिषदांना २० कोटी निधी देण्याचा शासन आदेश १३ मार्चला जारी करण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेअंतर्गत सुमारे दीड कोटीचे मटण मार्केट, एक कोटीचे म्युझियम, बहुद्देशिय इमारती, ओपन जिम, जिमखाना येथे सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, उपरल स्मशानभुमिचे नुतनीकरण, आत्मेश्वर तळीचा विकास, भटवाडी पुलांचे मजबुतीकरण बोअरवेल, उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी आणि विविध विकास कामांचा समावेश आहे.

वेंगुर्ल्यासाठी सुमारे ८ कोटी

वेंगुर्ला नगरपरिषदअंतर्गत रस्ते सुविधा आदी कामांसाठी सुमारे ८ कोटींची तरतूद असून वेंगुर्ला मांडवी भागात पर्यटनदृष्टया फ्लोटिंग रिसॉर्ट अंतर्गत कामासाठी ५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत.शहरातील पायवाटांचे सिमेंटीकरण रस्त्याचे डांबरीकरण स्ट्रीट लाईट, संरक्षक कठडयांचे बांधकाम आदी कामे अंतर्भुत आहेत.

दोडामार्ग जलशुद्धीकरण केंद्र

दोडामार्ग नगरपरिषदेसाठी २ कोटी ३० लाखाची तरतूद असून कसई दोडामार्ग हद्दीतील नळ योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी १ कोटी ७० लाखाची तरतूद आहे. तर साठवण टाकीसाठी ६० लाख निधी देण्यात आला आहे. 

यात सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच जुना फिश व मटण मार्केटसाठी आरक्षित जागेत मटण मार्केटचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ४७ लक्ष, निर्माण भवन बाजूच्या जागेत म्युझियमचे बांधकाम करण्यास पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्यावर पार्किंगसाठी सुविधेसाठी ९६ लक्ष, दर्पण सोसायटीमागील नाल्याचा उर्वरीत भाग स्लॅब घालून बंदिस्त करण्यासाठी ४० लक्ष, सबनीसवाडा सुवर्ण कॉलनी उद्यानमध्ये बहुद्देशिय बांधकाम व विविध विकास कामांसाठी ३० लक्ष, सुवर्ण कॉलनी बिरोडकर टेंब येथील न.प. च्या मालकीच्या खुल्या जागेत बहुद्देशिय इमारत बांधकामास ३० लक्ष तसेच खेळाचे मैदान या आरक्षणाचा विकास करणे, नरेंद्र डोंगर होळीचा खुंट येथे ओपन जिम व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी  ५० लक्ष, सालईवाडा टेलिफोन भवन समोरील जागेत बहुद्देशिय इमारत बांधण्यासाठी १ कोटी ५० लक्ष, जिमखाना मैदान येथे सिंथेटिक लॉन टेनिस कोर्टसाठी  ६० लक्ष, उपरल स्मशानभूमी येथे विविध विकास कामांस ६० लक्ष, स्पोर्ट कॉम्लेक्स चे दुसऱ्या मजल्यावर बहुद्देशिय हॉलसाठी ५० लक्ष, बापूसाहेब पुतळा ते राणी पार्वतीदेवी हायस्कूल ते शिवराम राजे पुतळयापर्यंत मोती तलावालगतच्या फुटपाथची दर्जावाढीस ६० लक्ष, आत्मेश्वर तळी परिसर अंतर्ग विविध विकासकामांस ५० लक्ष, खिश्चन सिमेंट्री दर्जावाढीस २० लक्ष, ओम गणेश बिल्डींग शेजारील गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवून इतर अनुषंगिक कामास १० लक्ष, दत्त नगर येथील खुल्या जागेत गार्डन विकासास १५ लक्ष तसेच रस्ते इतर सुविधांसाठी मिळून एकूण ९.७५ कोटी मंजूर झालेत. तसेत वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील मांडवी भागात पर्यटनदृष्टया फ्लोटिंग रिसॉर्ट अंतर्गत विविध विकास कामास ५कोटी तसेच रस्ते इतर रस्ते, गटारे व इतर सुविधांसाठी मिळून एकूण ७.९५ कोटी तसेच कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील मुख्य नळ योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारण्यास १७० लक्ष, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील नळ योजनेअंतर्गत नवीन साठवण टाकीचे (GSR) बांधकामास ६० लक्ष तसेच रस्ते इतर रस्ते, गटारे व इतर सुविधांसाठी मिळून एकूण २.३० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विकास कामाची घोडदौड वेगाने सुरु असून या २० कोटींच्या कामांमुळे तिन्ही शहरातील नागरिकांनी चांगल्या सुविधा प्राप्त होणार आहेत. या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शेकडो कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून धन्यवाद देण्यात येत आहे अशी माहिती विधानसभा संपर्क प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर महिला शहरप्रमुख सौ. भारती मोरे, वेंगुर्ला शहरप्रमुख - उमेश बाबुराव येरम महिला शहरप्रमुख सौ. श्रद्धा बाविसकर, दोडामार्ग शहरप्रमुख योगेश सुरेश महाले, महिला शहरप्रमुख सौ. शितल हरमलकर यांनी दिली आहे.