सराईत गुन्हेगारांविरुध्द 2 (टू) प्लस योजना सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यान्वित

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 12, 2023 17:17 PM
views 109  views

सिंधुदुर्गनगरी : दोन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या आरोपींचे पोलीस स्टेशन स्तरावर रेकॉर्ड तयार करुन त्यांचेवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 107, 110 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 55, 56, 57 नुसार हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, अशा गुन्हेगारांच्या कृत्यांवर प्रतिबंध घालणेसाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. सन 2023 मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 105 आरोपींची यादी अद्ययावत करण्यात आलेली आहे. त्यापैकी 82 आरोपींविरुध्द प्रतिबंधक कारवाई, तसेच हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आलेली असून इतर आरोपीविरुध्द प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित आहे.अशा सराईत गुन्हेगारांकडून वारंवार अशी कृत्य होवू नयेत यासाठी 2 (टू) प्लस योजना सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.

अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर मा. न्यायालयात वेळेत दोषारोप पत्र पाठविणे, तसेच कोर्ट कामकाजात विशेष लक्ष पुरवून गुन्ह्यात शिक्षा लागून दोषसिध्दी वाढविण्यासाठी ही विशेष प्रयत्न केले जात आहेत.  या गुन्हेगारांचे रेकॉर्ड पोलीस स्टेशन स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे अद्ययावत केले जात असून स्थानिक गुन्हे शाखेमार्फत दैनंदिन गुन्हे अहवाल पाहून गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपींची माहिती प्राप्त केली जाते व त्यांचे यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड पडताळणी करुन संबंधीत पोलीस ठाण्यास माहीती देवून योग्य ती प्रतिबंधक उपाययोजना राबविणेबाबत आदेश देण्यात येत आहेत.


            सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्रात शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे केलेल्या आरोपींचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम सुरू असून ज्या गुन्हेगारांवर 2 किंवा 2 पेक्षा अधिक मालमत्ते विषयी व शरिराविरुध्द गुन्हे दाखल असल्यास त्यांचेविरुध्द योग्य ती प्रतिबंधक उपाययोजनात्मक कारवाई करण्यात येत असून भविष्यातही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचेही पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल यांनी सांगितले.


            भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत, तसेच त्यांना वेळीच प्रतिबंध बसावा याकरीता ही योजना सुरू करण्यात आली असून, जर कोणी वारंवार अशा प्रकारचे कृत्य करीत असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे योग्य ती कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे