एकाच व्यक्तीची 2 ओळखपत्रे, 2 ठिकाणी अर्ज | काय म्हणते निवडणूक शाखा..

दोन प्रकरणांवर सुनील जाधव यांनी घेतला होता आक्षेप
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 07, 2022 17:04 PM
views 297  views

सिंधुदुर्ग : एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी दोन मतदार ओळखपत्र असणं हा गुन्हा आहे. अशी तरतूद निवडणूक आयोगाच्या नियमात आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. फड यांनी दिली. तर एखाद्या उमेदवाराने दोन ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरणे आणि त्यांची वैधता ही त्या त्या निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे, अशी माहिती उप जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली. त्यामुळे एक उमेदवार ग्रामपंचायतीसाठी कोणत्या कोणत्या मतदारसंघातून आपले नाम निर्देशन पत्र भरतो आणि एका व्यक्तीला दोन मतदार ओळखपत्र ठेवणे वैध आहे का आणि तो या दोन वेगवेगळ्या मतदार ओळखपत्रांवर वेगवेगळ्या ठिकाणाहून नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतो का? याबाबत कोणतेही संयुक्तिक उत्तर प्रशासनाकडून मिळालेले नाही.

ओरोस येथील रुचिता चव्हाण यांनी ओरोस व नरडवे या दोन ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर भक्ती पळसमकर यांनी ओरोस आणि पळसम या दोन ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरले होते. मात्र या दोघांनीही जे अर्ज भरले होते ते दोन वेगवेगळ्या मतदार ओळखपत्रांवर भरले होते. त्यामुळे यावर सुनील जाधव यांनी आक्षेप घेतला होता. या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जय कृष्ण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एकच व्यक्ती दोन मतदार ओळखपत्र ठेवू शकत नाही. एखादी व्यक्ती जर दुसऱ्या ठिकाणी बदलून गेली तर त्याने पूर्वीचे ओळखपत्र रद्द करून नवीन ठिकाणी आपले ओळखपत्र काढणे आवश्यक असते. त्यावेळेस जो अर्ज दिला जातो त्यामध्येही जर या अर्जातील माहिती खोटी असेल तर शिक्षेची व दंडाची तरतूद केलेली आहे.  त्यामुळे एकच व्यक्ती दोन मतदार ओळख पत्र वापरू शकत नाही.

मात्र या संदर्भातील अधिक माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांच्याकडे दूरध्वनी वरून घेतली असता ते म्हणाले की, एखाद्या उमेदवाराने दोन ठिकाणाहून अर्ज भरले तर ते वैध ठरवणे किंवा अवैध ठरवणे हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा नसून संबंधित रिटर्निंग ऑफिसरचा आहे. त्यामुळे तो त्यावरती निर्णय घेऊ शकतो. यामुळे नक्की या संदर्भातील कायदेशीर बाब काय आहे, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झालेली आहे. आता या दोन उमेदवारांचा दोन्ही ठिकाणी भरलेला अर्ज हा वैध ठरतो की अवैध ठरतो, त्या व्यक्तींनी दोनही ठिकाणची आपली मतदार ओळखपत्रे ठेवणे व त्यांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी दोन नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी करणे हे कितपत संयुक्तिक आहे, याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता दिसून आलेली नाही.