
दोडामार्ग : निसर्ग संपन्न व महाराष्ट्राचे ॲमेझॉन म्हणून ओळखले जाणाऱ्या सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात 15 फुटी किंग कोब्रा आढळून आला. सर्प मित्र विठ्ठल गवस यांनी त्याला पकडून वनवीभाच्या ताब्यात दिले त्यानंतर त्याला निसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
याबात अधिक माहिती अशिकी रविवारी 27 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान एक किंग कोब्रा रहदारीच्या रस्त्यावर फिरत असल्याचे झोळंबे येथील गावकऱ्यांना दिसले. त्यांनी गावातील सर्पमित्र श्री विठ्ठल गवस यांना या घटनेची माहिती दिली. गवस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच गवस यांना हा किंग कोब्रा असल्याचे लक्षात आले. अजस्त्र असणारा हा साप जवळपास 15 फूट लांबीचा होता. इतका मोठा साप पाहून उपस्थित गावकऱ्यांची भांबेरी उडाली होती. परंतु सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी या किंग कोब्रा सापास अतिशय शिताफीने व सुरक्षितपणे पकडले. या घटनेची माहिती दोडामार्ग वनपरिक्षेत्र विभागाला कळविण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग व सर्पमित्र गवस यांनी तात्काळ या सापास त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. हे संपूर्ण रेस्क्यू कार्य दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
किंग कोब्रा हा साप अतिशय घनदाट जंगलात राहणारा साप असून दोडामार्ग परिसरात त्याचा अधिवास पूर्वीपासून आहे. असे असले तरी महाराष्ट्रातून याची पहिली अधिकृत नोंद चंदगड तालुक्यातील तिलारीतून 2015 साली झाली आहे. पूर्वी संपूर्ण जगात या सापाची ऑफीओफॅगस हॅना ही एकच प्रजात असल्याचे मानले जात. परंतु काही महिन्यांपूर्वी सखोल संशोधनानंतर या प्रजातीचे 4 वेग वेगळ्या प्रजातींमध्ये रूपांतर झाले. त्यातील 2 प्रजाती भारतात असून उत्तर, ईशान्य व पूर्व भारतातील सापास ऑफीओफॅगस हॅना असे नाव ठेवण्यात आले तर पश्चिम घाटातील(दक्षिण भारत) प्रजातीस ऑफीओफॅगस कलिंगा असे नामकरण करण्यात आले. शरीराचा रंग पिवळसर शेवाळी, राखाडी हिरवट असतो. त्यावर पिवळसर- पांढरे आडवे पट्टे असतात. फणा नागापेक्षा कमी पसरट असतो. हा साप मानवी वस्तीपासून लांब राहणे पसंत करतो. किंग कोब्रा हा साप स्वभक्षी असून अन्य साप खाणे पसंत करतो. जानेवारी ते एप्रिल हा या सापाचा मिलन काळ असतो तर एप्रिल-मे दरम्यान मादी 15 ते 50 अंडी घालते. अंडी घालण्यापूर्वी मादी आपले शरीर व शेपटीच्या साह्याने पालापाचोळा गोळा करून साधारणतः 3.5 फूट व्यास व 2.5 फूट उंच घरटे तयार करते व त्यात अंडी घालते. हे घरटे शक्यतो डोंगराच्या उताराच्या बाजूस एखाद्या झाडाखाली तयार करते. जवळपास 60 ते 100 दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले अंड्यातून बाहेर पडेपर्यंत मादी घरट्याचे रक्षण करते. जगातील विषारी सापांपैकी सर्वात मोठा असणारा हा साप दोडामार्गच्या जैवविविधतेची परिपूर्णता दर्शवितो असे सर्प अभ्यासक व संशोधक राहुल शिंदे यांनी सांगितले.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेने नटलेला असून यापूर्वीही किंग कोब्रा दोडामार्ग वनपरिक्षेत्रात आढळल्याच्या नोंदी आहेत. हा साप मानवी वस्तीपासून लांब राहणे पसंत करत असल्याने गावकऱ्यांनी या सापास घाबरण्याचे कारण नाही. गरज भासल्यास मदतीकरिता जवळच्या सर्पमित्रास अथवा वनविभागास कळविणे.
अलीकडील काळात या परिसरात किंग कोब्रा आढळल्याच्या घटना वाढल्या असून गेल्या वर्षभरात हा दुसरा किंग कोब्रा मी या परिसरात पकडला आहे. मोठ्या धाडसाने व हिंमतीने हा 15 फूट अजस्त्र किंग कोब्रा पकडल्याची भावना व्यक्त करत सर्व उपस्थितांनी माझे आभार मानल्याने एक वेगळेच समाधान प्राप्त झाले आहे.