आखाती देशांत अडकलेल्या १४१ नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद

१२ जणांना तातडीच्या मदतीची गरज
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 07, 2026 20:52 PM
views 38  views

सिंधुदुर्ग :  जिल्हा प्रतिनिधी आखाती देशांमध्ये विविध कारणांमुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, ७ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आखाती देशांत अडकलेल्या एकूण १४१ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे.

नोंदणी झालेल्या १४१ नागरिकांपैकी ५ नागरिक सुरक्षितरीत्या भारतात परतले आहेत. मात्र, उर्वरित १३६ नागरिकांपैकी १२ नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. या १२ नागरिकांची देशानिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे:

कुवेत: ४ नागरिक

दुबई: २ नागरिक

कतार: २ नागरिक

इरान: २ नागरिक

सौदी अरेबिया: १ नागरिक

अबू धाबी: १ नागरिक

जिल्हा प्रशासनाने या १२ नागरिकांची माहिती राज्य शासनाने दिलेल्या पोर्टलवर भरली असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ ही लिंक देखील शेअर केली आहे.

तातडीची गरज असलेल्या नागरिकांव्यतिरिक्त इतर १२४ नागरिकांचीही नोंद प्रशासनाकडे आहे. यामध्ये प्रामुख्याने दुबई (६५), सौदी (१३), शारजा (१०) आणि कुवेत (९) येथील नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांनी नोंदणी केली असली तरी, त्यांना सध्या तातडीच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेत कतार, अबु धाबी, ओमान, बहारिन यांसारख्या देशांसह इस्रायल आणि अमेरिकेतील प्रत्येकी एका नागरिकाचीही नोंद झाली आहे.