
सिंधुदुर्गनगरी : महिलांच्या सुरक्षिततेकरीता कम्युनिटी पोलीसिंग उपक्रमाअंतर्गत राबवल्या जाणा-या दामिनी पथकाकरीता दुचाकी वाहनांचा अनावरण सोहळा कणकवली पोलीस ठाणे येथे पार पडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक कार्यरत असून त्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याचे दोन महिला अंमलदार शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, वसतीगृहे, एस.टी.स्टैंड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ अशा महिलांचा वावर जास्त असलेल्या ठिकाणी पेट्रोलिंग करीत असतात. महिलांची छेडछाड करणा-या रोडरोमियोंवर वचक ठेवण्याचे काम हे पथक करीत असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दामिनी पथक अधिक सक्षम करण्याकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना 13 दुचाकी वाहनांचे अनावरण करून वाटप करण्यात आले. तसेच महिलांबाबत गुन्हे व ईतर महत्वाचे कामकाज याचे नोंदी ठेवणयासाठी 13 टॅब चे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात कार्यरत डायल 112 हा हेल्पलाईन नंबर देखील या वाहनांना जोडण्यात येणार असून त्याचे माध्यमातून महिलांचे हेल्पलाईनवर प्राप्त कॉल ला तात्काळ प्रतिसाद देण्याचे काम दामिनी पथक करेल असे पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी व्यक्त केले. यावेळी महिलांसाठी उत्कृष्ट कामगिरी करणा-या सिंधुदुर्ग पोलीस दलातील महिला अंमलदारांचा तसेच सलग 25 वर्ष पोलीस अधीक्षक कार्यालय येथील भरोसा सेल येथे महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी सहकार्या करणा-या श्रीमती प्रतिभा नाटेकर यांचा सन्मान करण्यात आला.
कणकवली पोलीस ठाणे येथे आयोजित दामिनी पथक वाहन अनावरण सोहळ्यास सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अप्पर पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे सावंतवाडी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली, घनश्याम आढाव, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व स्टाफ, कणकवली क़ॉलेज शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पोलीसांच्या मदतीकरीता पोलीस दलाची वेबसाई https://www.sindhudurgpolice.gov.in/ तसेच, पोलीस दलाची आपत्कालीन हेल्पलाईन 112, कोस्टल हेल्पलाईन - 1093, सायबर क्राईम हेल्पलाईन 1930, सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन 7036606060, पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग व्हॉटस्अप नं. 8275776213 यावर संपर्क करावा.